अश्रफ गनी यांच्या अनुपस्थितीमुळे अमरुल्लाह सालेह यांची आपणच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असल्याची घोषणा

अमरुल्लाह सालेहकाबुल – राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या अनुपस्थितीत आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष ठरतो, असे घोषित करून उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी या देशातील घडामोडींना निराळेच वळण दिले. तालिबानच्या ताब्यात नसलेल्या अफगाणिस्तानच्या पंजशीर भागात असलेल्या सालेह यांनी ही घोषणा करून आपण तालिबानसमोर मान तुकवणार नसल्याचे जाहीर केले. अमेरिका आणि नाटोच्या सैन्यप्रमाणे आम्ही कच खाणार नाही, असा संदेश देऊन अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानशी संघर्ष करण्याची तयारी केली आहे.

तालिबानचे कट्टर विरोधक असलेले अफगाणी नेते अहमद शहा मसूद यांच्या मुलाच्या ताब्यात असलेल्या पंजशीर प्रांतात अमरुल्लाह सालेह यांनी आश्रय घेतला आहे. अफगाणींची तालिबानच्या विरोधात एकजूट करून इथूनच आपला संघर्ष सुरू होईल, असे सालेह यांनी म्हटले होते. तर तालिबानचे दहशतवादी सालेह यांना संपविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण इतर नेते अफगाणिस्तान सोडून आपला जीव वाचवित असताना, सालेह यांनी मात्र मोठी जोखीम पत्करून अफगाणिस्तानातच वास्तव्य केले आहे. यामुळे तालिबानच्या विरोधकांना हवा असलेला मोठा नेता उदयाला येत असल्याचे दिसते.

सोशल मीडियावरील आपल्या संदेशात अमरुल्लाह सालेह यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याची हुज्जत घालण्यात काडीचाही अर्थ राहिलेला नाही. तालिबान म्हणजे अमेरिकेचा पराभव करणारे व्हिएतनामीज्‌ नाहीत, असा शेरा सालेह यांनी मारला. ‘अमेरिका आणि नाटोप्रमाणे आम्ही उमेद सोडलेली नाही. अजूनही आमच्यासमोर फार मोठ्या संधी आहेत. आता निरर्थक इशारे काहीच उपयोगी ठरणार नाहीत. त्यापेक्षा तालिबानविरोधी संघर्षात सहभागी व्हा’, असे अमरुल्लाह सालेह यांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानची बरीचशी भूमी सध्या तालिबानच्या ताब्यात असली तरी अजूनही रशिद खान दोस्तम, गुलबद्दीन हिकमतयार हे तालिबानविरोधी नेते आपल्या इलाक्यात प्रभाव राखून आहेत. त्यांना अमरुल्लाह सालेह यांनी आवाहन केल्याचे समोर येत आहे. ‘अफगाणिस्तानच्या सर्वच नेत्यांशी मी संपर्क साधणार आहे. या संघर्षात त्यांचे सहाय्य व सहकार्य अपेक्षित आहे’, असे सालेह पुढे म्हणाले. याद्वारे तालिबानच्या विरोधात नवी लष्करी आघाडी उभी करण्याचा संदेश सालेह यांनी दिला. त्याला अफगाणी नेत्यांचा प्रतिसाद मिळाला, तर तालिबानला टक्कर देणारी शक्ती उदयाला येऊ शकते.

दरम्यान, अमरुल्लाह सालेह हे तालिबान व तालिबानच्या मागे आपले पाठबळ उभे करणाऱ्या पाकिस्तानचे कडवे विरोधक आहेत. आता आपणच अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असल्याचे जाहीर करून संघर्षाची तयारी करणाऱ्या या नेत्यामुळे तालिबानच्या विरोधकांना सध्या तरी काहिसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात तालिबानच्या विरोधकांची एकजूट करण्यात सालेह यांना यश मिळाले, तर अफगाणिस्तानातील चित्र पुन्हा एकदा पलटू शकते.

leave a reply