अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील आक्रमण सुरुवातीपासूनच अपयशाचे संकेत देणारे

- रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा दावा

अपयशाचे संकेतमॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेले आक्रमण सुरुवातीपासूनच अपयशाचे संकेत देणारे होते, असा दावा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी केला. गोर्बाचेव्ह यांच्याच काळात 1989 साली रशियाने अफगाणिस्तानातून माघार घेतली होती. त्यामुळे अमेरिकेच्या माघारीनंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरते.

गेल्या वर्षी अमेरिकेने तालिबानबरोबर करार करून अफगाणिस्तानमधील आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राष्ट्राध्यक्षपदावर आलेल्या ज्यो बायडेन यांनीही सैन्यमाघारीचा निर्णय कायम ठेवला. मात्र मे महिन्याऐवजी सप्टेंबर महिन्यापर्यंत माघारी पूर्ण होईल, असे जाहीर केले. अमेरिका व नाटो देशांच्या माघारीनंतर तालिबान पुन्हा संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र अमेरिकेची माघारीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला आहे.

या ताब्याच्या पार्श्‍वभूमीवर जगभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही विश्‍लेषकांनी अमेरिकेची माघार आणि अफगाणिस्तानातील पाडाव गेल्या शतकातील रशियाच्या माघारीपेक्षाही भयानक व मानहानीकारक असल्याची टीका केली आहे. अशा वेळी तत्कालिन सोव्हिएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरले आहे.

अपयशाचे संकेत‘अगदी सुरुवातीपासूनच अमेरिकेचे अफगाणिस्तानवरील आक्रमण ही वाईट कल्पना होती. रशियाने त्याचे सुरुवातीला समर्थनही केले होते. अमेरिकेने खूप आधीच आपले अपयश मान्य करायला हवे होते. किमान आतातरी अमेरिकेने या स्थितीतून धडा घेणे महत्त्वाचे आहे. यापुढे चुकांची पुनरावृत्ती होता कामा नये’, असे गोर्बाचेव्ह यांनी बजावले. ‘इतर मोहिमांप्रमाणे अफगाणिस्तानच्या बाबतीतही नसलेला धोका अतिशयोक्तीपूर्णरित्या समोर मांडला गेला. त्याच्याशी निगडीत भूराजकीय कल्पनाही योग्य रित्या आखण्यात आलेल्या नव्हत्या’, असेही गोर्बाचेव्ह पुढे म्हणाले. विविध वांशिक गटांनी बनलेल्या समाजाला लोकशाहीच्या सूत्रात बांधण्याचे प्रयत्न वास्तवाला धरुन नव्हते, याकडेही रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.

गेल्या शतकात तत्कालिन सोव्हिएत रशियन राजवटीने 1979 साली अफगाणिस्तानात आपले सैन्य तैनात केले होते. जवळपास एक लाखांहून अधिक सैन्य तैनात करूनही रशियाला अफगाणिस्तानात स्थैर्य व रशियासमर्थक राजवट आणण्यात अपयश आले होते. त्याचवेळी अमेरिकेने पाकिस्तानच्या सहाय्याने अफगाण बंडखोर गटांना मोठ्या प्रमाणात शस्त्रे व अर्थसहाय्य पुरवून रशियाविरोधात आघाडी उभी केली. या आघाडीला तोंड देण्यात अपयशी ठरलेल्या सोव्हिएत रशियाने मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या नेतृत्त्वाखाली करार करून 1989 साली माघार घेतली होती. या माघारीनंतर अवघ्या दोन वर्षातच सोव्हिएत रशियाला विघटनाला सामोरे जावे लागले होते.

leave a reply