साकीनाक्यातील बलात्काराच्या घटनेवर राज्यभरातून संताप

- पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

साकीनाकामुंबई – अंधेरी साकीनाक्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या बलात्काराच्या घटनेने सार्‍या महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. २०१२ साली दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्काराच्या घटनेची आठवण यामुळे ताज्या झाल्या असून या घटनेनंतर जनप्रक्षोब दिसून येत आहे. सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रीया उमटत असून आरोपीला ताबडतोब फासावर चढवा, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास पोलीस कन्ट्रोल रुममध्ये एका टॅम्पोमध्ये महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती देणारा फोन आला होता. घटनेच्या ठिकाणाजवळ असलेल्या एका कंपनीच्या सुरक्षारक्षकांने टॅम्पोमध्ये एका महिलेला मारहाण होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दहा मिनिटातच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पीडिता रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध स्थितीत सापडली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले. तसेच तिच्या गुप्तांगावर धारधार शस्रांनी वारही करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये पीडितेवर उपचार करण्यात आले. मात्र या पीडितेची मृत्युशी ही झुंज अपयशी ठरली.

अत्यंत पाशवीरित्या पीडितेला मारहण करण्यात आले होती. त्यामुळे अंतर्गत इजा व रक्तस्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. तिची स्थिती गंभीर असल्यामुळे तिचा जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही. मात्र या भागातील सीसीटीव्ही फुटेजची छाननी केल्यावर पोलिसांना एक संशयित आढळला. त्या आधारावर तपास करून पोलिसांनी मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डागही सापडले आहेत.

या महिलेला दोन लहान मुली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच घटनेपुर्वी नेमके काय घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस याचा तपास करीत असून आरोपीची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. ही घटना उघड झाल्यावर सर्वस्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या, अशी मागणी होत असून हा अपराधी सुटता कामा नये, यासाठी एसआयटी स्थापन करून तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यानंतर या प्रकरणी कलम ३०७, ३७६, ३०२ कलमाअंतर्गत पुढील कारवाई होणार असून एक महिन्यात तपास पुर्ण करण्यात येईल, असे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जाहीर केले. यासाठी एसआयटीची स्थापना केली जाणार असल्याचे ते म्हणाले. तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालावे, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

दरम्यान, बुधवारी पालघर जिल्ह्यात एका गतीमंद मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला होता. या प्रकारणत नालासोपार्‍यातून या नराधमाला अटक करण्यात आल्याची माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली आहे. या गतीमंद मुलीने अपहरण करून या नराधमाने या मुलीवर अत्याचार केला होता.

leave a reply