भारत-युएईची धोरणात्मक सहकार्य वाढविण्याची घोषणा

अबू धाबी – भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बाहरिन, संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दौऱ्यानंतर सेशेल्समध्ये दाखल झाले आहेत. याआधी युएईमधील आपल्या दौऱ्यात परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कोरोनाव्हायरसच्या संकटातून भारत व युएईने बोध घेऊन धोरणात्मक सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. भारताचे ‘युएई’बरोबरील धोरणात्मक संबंध दृढ होत असताना, भारताने आपला महत्त्वाचा मित्रदेश पळविल्याची तक्रार करून पाकिस्तानचे विश्‍लेषक गळे काढत आहेत.

बाहरिननंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर युएईच्या दौऱ्यावर आले आणि त्यांनी युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नह्यान यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत उभय देशांमधील व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, ऊर्जा, अन्नसुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य व्यापक करण्यावर एकमत झाले. त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही महत्त्वपूर्ण चर्चा केल्याचे वृत्त आहे. भारत व युएईमध्ये धोरणात्मक संबंध विकसित होत असताना, पाकिस्तान व युएईचे संबंध ताणले गेले आहेत. युएईने पाकिस्तानला दिलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला आहे. इतकेच नाही तर युएईमध्ये कार्यरत असलेल्या पाकिस्तानी कामगारांची लवकरच हकालपट्टी केली जाईल, असे संकेतही युएईकडून दिले जात आहेत. हे सारे भारताच्या युएईवरील प्रभावामुळे घडत असल्याचा आरोप पाकिस्तानचे काही भारतद्वेष्टे विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply