‘एनएचएसआरसीएल’-‘एल ॲण्ड टी’मध्ये बुलेट ट्रेनसाठी 25 हजार कोटींचा करार

नवी दिल्ली – भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे मोठे कंत्राट लार्सन ॲण्ड टुब्रो (एल ॲण्ड टी) कंपनीला मिळाले असून यासाठी ‘द नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन’बरोबर (एनएचएसआरसीएल) करार झाला आहे. एकूण 25 हजार कोटी रुपयांच्या या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या झाल्या. हा आतापर्यंतचा देशातील पायाभूत सुविधेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा सरकारी करार ठरला आहे.

‘एनएचएसआरसीएल’ने मुंबई-अहमदाबाद या 508 कीलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पापैकी आतापर्यंत 325 कीलोमीटर मार्गाचे कंत्राट ‘एल ॲण्ड टी’ला दिले आहे. हे सर्व काम गुजरातमधील आहे. पंतप्रधान मोदी यांनी ज्या भागात अधिग्रहण पूर्ण झाले आहे, तेथील कामे पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच कामाची गती वाढविण्यासाठीही बजावल्याचे वृत्त आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘एल ॲण्ड टी’ला देण्यात आलेल्या एका कंत्राटासंदर्भात करार संपन्न झाला आहे.

बुलेट ट्रेनची निरनिराळी कंत्राटे ‘एल ॲण्ड टी’ला मिळाली आहेत. गुरुवारी महाराष्ट्राच्या सीमेवरील वापीच्या झरोली गावापासून बडोद्यापर्यंतच्या 237 कीलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गासाठी ‘एनएचएसआरसीएल’ आणि ‘एल ॲण्ड टी’मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या. यामध्ये वापी, बिल्लिमोरा, सुरत,भरुच या रेल्वे स्थानकांच्या कामांचाही समावेश आहे. तसेच सुरत येथील डेपो, 14 नदीपुल, सहा रेल्वे क्रॉसिंग पुल आणि 42 रोड क्रॉसिंग पुलांच्या कामाचाही समावेश आहे.

हे कंत्राट एकूण 25 हजार कोटी रुपयांचे असून देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात आतापर्यंत पार पाडलेला हा सार्वात मोठा करार ठरला आहे. 23 सप्टेंबर रोजी यासंदर्भातील निविदा उघडण्यात आल्या होत्या. पुढील चार वर्षात हे काम पुर्ण करायचे आहे. गेल्याच आठवड्यात ‘एल ॲण्ड टी’ला आणखी 87 कीलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गाचेही कंत्राट मिळाले होते. मात्र यासंबंधी ‘एनएचएसआरसीएल’बरोबर करार अजून संपन्न झालेला नाही. हा करार 7,289 कोटी रुपयांचा असेल.

leave a reply