पाकिस्तानच्या कराचीमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट

- पाकिस्तानातील चीनच्या कन्फ्युशिअस इन्स्टिट्युटच्या शिक्षकांचे पलायन सुरू

इस्लामाबाद – पाकिस्तानचे कराची शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. सोमवारी रात्री येथील खारदार भागात झालेल्या स्फोटात एकाचा बळी गेला असून 11 जण जखमी झाले आहेत. गेल्या महिन्याभरात कराचीमध्ये झालेला हा तिसरा बॉम्बस्फोट ठरतो. 26 एप्रिल रोजी कराची विद्यापीठातील कन्फ्युशिअस इन्स्टिट्युटच्या आवारात झालेल्या आत्मघाती स्फोटात चीनचे तीन अधिकारी मारले गेले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सरकारने चिनी नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली होती. पण बॉम्बस्फोट व घातपात रोखण्याची क्षमता पाकिस्तानकडे उरलेली नाही, हे उघड झाल्यानंतर भयभीत झालेल्या चिनी नागरिकांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

कराचीतील इक्बाल मार्केटजवळ असलेल्या खारदार भागात तैनात असलेल्या पाकिस्तानी सुरक्षा जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आला. एका मोटारबाईकवर बॉम्ब ठेवण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक पोलीस यंत्रणांनी दिली. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. तर पाकिस्तानी यंत्रणांनी देखील कुठल्याही संघटनेवर आरोप करण्याचे टाळले आहे.

गेल्या आठवड्यात कराचीमध्येच लष्कराच्या वाहनाजवळ स्फोट घडविण्यात आला होता. स्वतंत्र सिंधुदेशची मागणी करणाऱ्या बंडखोरांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. तर त्याआधी 26 एप्रिल रोजी कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशिअस इन्स्टिट्युटच्या आवारात शक्तीशाली आत्मघाती स्फोट झाला होता. स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणाऱ्या ‘बलोच लिबरेशन आर्मी-बीएलए’च्या माजिद ब्रिगेडने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट ही चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा प्रचार करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. सदर संस्थेच्या पाकिस्तानातील प्रमुखच या स्फोटात मारला गेल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये होती. यानंतर चिनी माध्यमांनी पाकिस्तानातील सीपीईसी प्रकल्पासाठी धोकादायक ठरणाऱ्या दहशतवाद्यांवर हल्ले चढविण्याचे आवाहन केले होते. यासाठी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने पाकिस्तानात जवान तैनात करण्याची सूचना चीनच्या मुखपत्राने केली होती. तर पाकिस्तानने देखील चिनी नागरिक व अधिकाऱ्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची घोषणा केली होती.

पण पाकिस्तानचा विश्वास गमावलेले चिनी नागरिक तसेच कन्फ्युशिअसचे शिक्षक पाकिस्तानातून पळ काढत आहेत. अधिक चांगल्या दर्जाचे शिक्षक पाकिस्तानात येतील, अशा सबबी देऊन पाकिस्तानातील चीनचे राजदूत या प्रकरणी सारवासारव करीत आहेत.

leave a reply