इराण अणुप्रकल्पांमध्ये हजार सेंट्रिफ्युजेस इन्स्टॉल करीत आहे

- इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ

जेरूसलेम – अमेरिका आणि युरोपिय देशांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींच्या आड इराण आपला अणुकार्यक्रम वेगाने पुढे नेत असल्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. इराणने नातांझसह इतर अणुप्रकल्पांमध्ये हजार सेंट्रिफ्युजेस बसविण्यास सुरुवात केल्याचे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले. तसेच इराणचा धोका अणुकार्यक्रमापर्यंत मर्यादित नसून इराणचे ड्रोन्स देखील इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देत असल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला.

इराणचा अणुकार्यक्रम आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून असलेला धोका यावर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री बेनी गांत्झ लवकरच अमेरिकेला रवाना होतील. त्याआधी ‘इन्स्टिट्युट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज्‌‍-आयएनएसएस’ या अभ्यासगटाला संबोधित करताना इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमात झालेल्या बदलांची माहिती दिली.

‘प्रगत सेंट्रिफ्युजेसचे संशोधन, निर्मिती आणि त्यांचा वापर करण्याबाबत इराणने व्यापक माहिती मिळविली आहे. यामुळे इराण अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य मिळविण्याच्या अवघे काही आठवडे दूर आहे’, असा इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला. अमेरिका व युरोपिय देशांबरोबर वाटाघाटी सुरू असताना, इराणने ही सारी माहिती मिळविल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला.

याच काळात इराणने आपल्या अणुप्रकल्पांमध्ये हजार सेंट्रिफ्युजेस बसविण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये हे हजार सेंट्रिफ्युजेस बसवून पूर्ण झालेले असेल, याकडे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लक्ष वेधले. इराणने नातांझ अणुप्रकल्पाच्या तळघरातही सेंट्रिफ्युजेस बसविण्यास सुरुवात केल्याचे गांत्झ यांनी लक्षात आणून दिले. इराणच्या अणुकार्यक्रमातील या महत्त्वाच्या बदलांसाठी अमेरिका व युरोपिय देश जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केली आहे.

त्याचबरोबर सिरिया, इराकसह लेबेनॉन व गाझापट्टीतील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून वाढत असलेला धोका देखील गांत्झ यांनी अधोरेखित केला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इराकमध्ये इराणचे दोन ड्रोन्स पाडण्यात आले. गाझापट्टी किंवा वेस्ट बँकमधील दहशतवादी संघटनांना सहाय्य नेत असताना हे ड्रोन्स पाडण्यात आले होते, असा दावा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला.

सदर ड्रोन्स इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे होते, असे गांत्झ म्हणाले. याद्वारे अमेरिकेने रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळू नये, असे आवाहन गांत्झ यांनी केल्याचे दिसते. तसेच इराणचे इराकमध्येही ड्रोन्स पाडण्याची क्षमता आपल्याकडे असल्याची आठवण इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी करुन दिली आहे. रविवारी पार पडलेल्या इस्रायलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी कुठल्याही परिस्थितीत इस्रायल दहशतवाद्यांवरील कारवाई थांबविणार नसल्याचे बजावले होते. सध्या इस्रायलच्या विरोधात जहरी अपप्रचार सुरू असला, तरी त्याचा इस्रायलच्या दहशतवादविरोधी कारवाईवर त्याचा परिणाम होणार नसल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी ठासून सांगितले होते. तर इराणच्या अणुकार्यक्रमाचा आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून इस्रायलला असलेल्या धोक्याचा मुद्दा संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्याआधी उपस्थित केला आहे. याद्वारे इस्रायल अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला संदेश देत असल्याचे दिसते.

leave a reply