अमेरिका-कॅनडाने संयुक्त कारवाईत आणखी एक ‘युएचएओ’ पाडले

- कॅनडाच्या हद्दीतील कारवाईनंतर अमेरिकेच्या मोंटानामधील हवाईहद्दीत ‘शटडाऊन’

वॉशिंग्टन/व्हँकोव्हर – शुक्रवारी अमेरिकेच्या अलास्का प्रांतात केलेल्या कारवाईनंतर अवघ्या 24 तासांच्या अवधीत दुसरे ‘अनआयडेंटिफाईड् हाय-अल्टिट्यूड ऑब्जेक्ट’ (युएचएओ) पाडले आहे. कॅनडातील युकॉन प्रांताच्या हद्दीत आढळलेले ‘युएचएओ’ अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लक्ष्य करण्यात आल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रूड्यू यांनी सांगितले. अवघ्या 24 तासांमध्ये उत्तर अमेरिकेत दोन ‘युएचएओ’ आढळल्याने खळबळ उडाली असून दोन्ही देशांच्या यंत्रणांनी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. कॅनडात केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेच्या मोंटाना प्रांतातील हवाईहद्दीत काही काळ ‘शटडाऊन’ करण्यात आला होता. यावर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

शनिवारी कॅनडाच्या युकॉन प्रांतात जवळपास 40 हजार फुटांवर एक अनोळखी वस्तू वेगाने घिरट्या घालताना आढळली. त्यानंतर कॅनडाच्या हवाईदलाने तातडीने या भागात शटडाऊनची घोषणा केली. त्याचवेळी कॅनडा सरकारने अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. अलास्कामधील घटनेनंतर अलर्टवर असलेल्या अमेरिकी हवाईदलाने आपली लढाऊ विमाने कॅनडात पाठविली.

शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास, अमेरिकेच्या ‘एफ-22 रॅप्टर’ या लढाऊ विमानाने ‘एआयएम 9 एक्स’ क्षेपणास्त्राच्या सहाय्याने ‘युएचएओ’ पाडल्याची माहिती कॅनडाच्या संरक्षणमंत्री अनिता आनंद यांनी दिली. हवाईहद्दीतील हालचालींना धोका असल्याचे संकेत मिळाल्याने सदर ‘युएचएओ’ पाडण्यात आल्याचेही आनंद यांनी स्पष्ट केले. सदर वस्तू छोटी व वर्तुळाकार आकाराची होती, असेही कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्याचे अवशेष ताब्यात घेऊन पुढील विश्लेषण करण्यात येईल, असे कॅनडा सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.

अवघ्या आठ दिवसांच्या अवधीत उत्तर अमेरिकेच्या हवाईहद्दीत ‘स्पाय बलून’सह दोन ‘युएचएओ’ आढळल्याने सदर घटनाक्रम लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या ‘स्पाय बलून’ने अमेरिकेच्या मोंटाना प्रांतातून घुसखोरी केली होती. पाच दिवस अमेरिकेच्या हवाईहद्दीतून प्रवास केल्यानंतर अमेरिकेने एफ-22च्या सहाय्याने साऊथ कॅरोलिनाच्या किनारपट्टीजवळ चीनचे हे स्पाय बलून पाडले होते. अमेरिकन क्षेपणास्त्रांच्या साठ्याची हेरगिरी करण्यासाठी चीनने हे स्पाय बलून रवाना केले होते, असे आरोप अमेरिकेतून झाले होते. त्यानंतर गुरुवारी अलास्काच्या हवाईहद्दीजवळ सदर ‘युएचएओ’ दिसल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाला मिळाली होती. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आदेश मिळाल्यानंतर अलास्काच्या उत्तरेकडील किनारपट्टीजवळून 40 हजार फूट उंचीवरुन प्रवास करणारे सदर युएचएओ भेदण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कॅनडाच्या हद्दीतही ‘युएचएओ’ आढळल्याने या घटनांमागील गूढ अधिकच वाढताना दिसत आहे. दोन्ही ‘युएचएओ’ज्‌‍बद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

गेल्या काही वर्षात अमेरिकेत ‘युएफओ’ अर्थात अनोळखी उडत्या तबकड्या आढळण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी संसदेला विस्तृत अहवालही सादर केला आहे. त्यात अनेक घटनांमागे कोणताही खुलासा अथवा स्पष्टीकरण नसल्याचे यंत्रणांकडून सांगण्यात आले आहे. ‘युएफओ’ अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील, असे इशारे आजी-माजी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता अमेरिका व कॅनडात आढळलेल्या ‘युएचएओ’च्या घटना लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात.

leave a reply