दिल्ली-मुंबई ‘एक्सप्रेस वे’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

Delhi-Mumbaiदौसा – दिल्ली व मुंबईमधील ‘एक्सप्रेस वे’चा भाग असलेल्या दिल्ली-दौसा-लालसोत या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 246 किलोमीटरच्या या महामार्गामुळे दिल्ली व राजस्थानमधील अंतर खूपच कमी होणार असून या प्रवासासाठी लागणारा वेळ देखील वाचेल. नवी दिल्ली व मुंबईमधील ‘एक्सप्रेस वे’ प्रकल्पाचा पहिला टप्पा असलेल्या या महामार्गासाठी सुमारे 18 हजार कोटी रुपये इतका खर्च आल्याचे सांगितले जाते.

देशाची राजधानी नवी दिल्ली व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जोडणारा महामार्ग विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा 2018 साली करण्यात आली होती. यासाठी सुमारे 98 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. 1386 किलोमीटर अंतराच्या या महामार्गातील दिल्ली ते राजस्थानच्या दौसापर्यंतचा पहिला टप्पा पूर्ण झाला व रविवारी याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Delhi-Mumbai-Expresswayमहामार्ग, बंदर, रेल्वे, ऑप्टिकल फायबर, वैद्यकिय महाविद्यालयांमध्ये ज्यावेळी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते, त्याचा फार मोठा लाभ जनसामान्यांना मिळतो. छोटे व्यापारी, छोटे उद्योजक व उद्योगक्षेत्राला या गुंतवणुकीचे अनेकविध लाभ मिळतात. पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे नवी गुंतवणूक होते आणि अर्थकारणाला चालना मिळते, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. सदर एक्सप्रेस वेच्या पहिल्या टप्प्यामुळे जयपूर ते दिल्लीपर्यंतच्या प्रवासासाठी लागणारा कालावधी अर्ध्याने कमी होईल, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

कामकाजासाठी दिल्लीला जाणारे जयपूरवासिय या महामार्गामुळे आपले काम पूर्ण करून संध्याकाळपर्यंत घरी परतू शकतील. तसेच या महामार्गाशी जोडलेल्या स्थानिकांचाही मोठ्या प्रमाणात विकास होईल. कारण या महामार्गाच्या बाजूला छोट्या विक्रेत्यांसाठी बाजार उभारण्यात येणार आहे. याचा कारागीर व छोट्या व्यावसायिकांना फायदा होईल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवी दिल्ली व मुंबईमधील हा एक्सप्रेस वे आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठ्या लांबीचा महामार्ग ठरणार असून दिल्लीपासून हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्या या महामार्गामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हिंदी

leave a reply