मुल्ला बरादरला वगळून कतारचे परराष्ट्रमंत्री तालिबानच्या नेत्यांना भेटले

काबुल – तालिबानच्या स्थापनेपासूनच या संघटनेचा प्रमुख नेता असणारा मुल्ला बरादर मारला गेल्याची बातमी सोमवारी सकाळी प्रसिद्ध झाली. त्यातच कतारचे परराष्ट्रमंत्री अल-थानी यांनी तालिबानच्या नेत्यांची भेट घेतली तेव्हा बरादर नव्हता. यामुळे तालिबानमधील संघर्षात बरादर मारल्या गेल्याच्या दाव्यांना अधिकच बळ मिळत आहे. पण पुढच्या काही तासात तालिबानने मुल्ला बरादरचा ऑडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये बरादरने आपण जिवंत असल्याचा तसेच तालिबानमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा संदेश दिला. पण कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरच्या भेटीत बरादर दिसलेला नाही, याकडे विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

मुल्ला बरादर हा तालिबानमधील दुसर्‍या क्रमांकाचा नेता मानला जातो. तालिबानने अफगाणिस्तानात सरकारस्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यानंतर, बरादर याला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनविणार असल्याच्या बातम्या आखाती माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. पण आठवड्यापूर्वी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांच्या आकस्मिक काबुल भेटीनंतर, तालिबानने सरकारस्थापनेची घोषणा पुढे ढकलली.

अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये हक्कानी गटाच्या हाती सत्ता केंद्रीत व्हावी यासाठी हमीद प्रयत्न करीत होते. पाकिस्तानात तळ असलेला हक्कानी नेटवर्क हा पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचा हस्तक असल्याचा दावा केला जातो. सत्तेतील वाट्यावरून बरादर आणि हक्कानी गटामध्ये संघर्ष पेटल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यात मुल्ला बरादर व सहकारी जबर जखमी झाल्याचे बोलले जात होते. तालिबानने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण गेले काही दिवस बरादर संशयास्पदरित्या गायब होता.

गेल्या आठवड्यात तालिबानने सरकारस्थापनेची घोषणा करून बरादरला उपपंतप्रधान म्हणून नियुक्त केल्यानंतर आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते. अशातच सोमवारी सकाळी स्थानिक अफगाणी पत्रकारांनी मुल्ला बरादर मारला गेल्याचा दावा केला. या बातमीने अफगाणिस्तानसह पाकिस्तानातही खळबळ उडाली होती. आठवड्यापूर्वी सत्तासंघर्षावरुन बरादर आणि हक्कानी गटात संघर्ष पेटल्याच्या बातम्यांना बळ मिळाल्याचे दावे सोशल मीडियातून करण्यात आले.

त्याचबरोबर कतारचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल-थानी यांनी शिष्टमंडळासह तालिबान तसेच अफगाणिस्तानच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले. यामध्ये तालिबानच्या इतर बड्या नेत्यांसह माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई आणि डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्या नावांचा समावेश होता. पण यात मुल्ला बरादरच्या नावाचा उल्लेख नव्हता. त्यामुळे तालिबानमधील संघर्षात बरादर मारला गेल्याचा संशय अधिकच बळावला.

पुढच्या काही तासात तालिबानने बरादरचा ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला. यामध्ये बरादरने आपण जिवंत असल्याचे तसेच दौर्‍यांवर असल्याचे म्हटले आहे. माध्यमे चुकीच्या बातम्या देत असून तालिबानमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचे बरादरने सांगितले. पण हा बरादरचाच आवाज होता का? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. खुलासा द्यायचाच होता, तर तालिबानने मुल्ला बरादरचा व्हिडिओ का प्रसिद्ध केला नाही? असा प्रश्‍न काहीजणांनी उपस्थित केला आहे.

leave a reply