मुस्लिम ब्रदरहूड इजिप्तला आतून पोखरत आहे

- राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांचे टीकास्त्र

कैरो – मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना गेली ९० वर्षे इजिप्तला आतून पोखरून काढत आहे, अशी जळजळीत टीका इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी केली. यावेळी त्यांनी काही देश इतर देशांमधील संघर्षाला खतपाणी घालून निर्वासितांचे लोंढे तयार करीत आहेत आणि त्यातून कट्टरपंथियांच्या पिढ्या घडविण्यात येत आहेत, असा आरोप केला. त्यामुळे एका मोठ्या क्षेत्राचे दशकानुदशके मोठे नुकसान होत असल्याचा दावाही इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. इजिप्तच्या सरकारने मुस्लिम ब्रदरहूडला याआधीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

इजिप्त सरकारकडून राष्ट्रीय मानवाधिकार धोरणाची घोषणा करण्यात येणार असून, या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी मुस्लिम ब्रदरहूडवर टीकास्त्र सोडले. ‘मुस्लिम ब्रदरहूड गेली ९० वर्षे इजिप्तचे मन व शरीर पोखरत आहे. ब्रदरहूडसारख्या संघटना संपूर्ण देशाला कुरतडत आहेत. या संघटनेकडून सरकारविरोधात संशय व अविश्‍वासाचे वातावरण निर्माण केले जात आहे’, अशी टीका राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी केली. यावेळी सिसी यांनी कोणत्याही देशाचे नाव न घेता, काही देश अशा संघटनांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही केला.

‘काही देशांकडून इतर देशांमधील संघर्षांना व विनाशाला प्रोत्साहन दिले जात आहे. यातून लक्षावधी निर्वासितांचे लोंढे तयार होत आहेत. या लोंढ्यांमधूनच कट्टरपंथियांच्या पिढ्या घडविण्यात येत आहेत. या कट्टरपंथियांकडून जगातील व्यापक क्षेत्राचे दशकानुदशके नुकसान होत आहे’, असा दावा इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी मुस्लिम ब्रदरहूड व त्याला समर्थन देणार्‍या देशांवर केलेली ही टीका लक्ष वेधून घेणारी ठरतेे.

इजिप्तच्या सिसी सरकारने गेल्या काही वर्षात मुस्लिम ब्रदरहूडविरोधातील कारवाई अधिक व्यापक व तीव्र केली आहे. या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर इजिप्त सरकारने अनेक प्रमुख नेत्यांना अटक करून मालमत्ता तसेच निधी गोठविला होता. मुस्लिम ब्रदरहूडच्या १०० हून अधिक सदस्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच इजिप्तच्या न्यायालयाने ब्रदरहूडच्या २४ सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.

त्यानंतर इजिप्तने देशातील प्रार्थनास्थळांना ब्रदरहूडशी संबंधित सर्व प्रकारचे साहित्य काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इजिप्तमधील एका न्यायालयाने ब्रदरहूडच्या ३१ सदस्यांना पाच वर्षांसाठी दहशतवादी म्हणून घोषित केल्याचा आदेशही दिला आहे. यात ब्रदरहूडचे उपप्रमुख खैरात अल-शातर यांची मुलगी आयशा शातरचा समावेश आहे. त्याचवेळी तुर्कीनेही मुस्लिम ब्रदरहूडच्या १५ प्रमुख सदस्यांना इजिप्तच्या हवाली करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासंदर्भात दोन देशांमध्ये बोलणी झाल्याची माहिती इजिप्तकडून देण्यात आली आहे.

आफ्रिका व आखाती देशांमध्ये भडकलेल्या ‘अरब स्प्रिंग’च्या काळात मुस्लिम ब्रदरहूडने इजिप्तमधील हुकुमशहा होस्नी मुबारक यांची राजवट उलथवली होती. त्यानंतर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या मोहम्मद मोर्सी यांनी ब्रदरहूडवरील बंदी उठविली होती. मात्र दीड वर्षांनंतर इजिप्तच्या लष्कराने बंड करून ब्रदरहूडची सत्ता उधळून लावली. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या सिसी यांनी ब्रदहूडविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून प्रमुख नेत्यांसह शेकडो सदस्यांची धरपकड करून तुरुंगात टाकले आहे.

इजिप्तने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या वर्षी सौदी अरेबिया व युएई या देशांनीही मुस्लिम ब्रदरहूडला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.

leave a reply