सुमारे १३ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या खरेदीला मंजुरी

नवी दिल्ली – पाकिस्तान व चीनबरोबरील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील बनलेली असताना, संरक्षण मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला. यानुसार सुमारे १३,१६५ कोटी रुपयांच्या संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांची खरेदी केली जाणार आहे. यात ‘ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स’ व रॉकेटस्चा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने अर्जुन रणगाड्यांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

सुमारे १३ हजार कोटी रुपयांहून अधिक किंमतीची शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याच्या खरेदीला मंजुरीऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्सच्या (एएलएच) श्रेणीत येणारी सुमारे २५ हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा सुमारे ३,८५० कोटी रुपयांच्या खरेदीव्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. तर रॉकेटस् ऍम्युनेशनसाठी ४,९६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्रालयाने अर्जुन रणगाड्यांबाबतच्या ७,५२३ कोटी रुपयांच्या खरेदी व्यवहाराला मान्यता दिली होती. त्याच्या आधी सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या ‘सी-२९५’ या लष्करी वाहतूक करणार्‍या विमानांच्या खरेदीचा निर्णय झाला होता.

पाकिस्तान व चीनच्या आक्रमकतेत वाढ होत असताना, भारताच्या दोन्ही सीमांवरील परिस्थिती संवेदनशील बनली आहे. चीनने गेल्याच महिन्यात उत्तराखंडच्या सीमाभागात घुसखोरी केल्याची बातमी आली होती. लडाखच्या एलएसीवर भारतीय सैनिकांसमोर टिकाव धरू न शकलेला चीन पुढच्या काळात अशारितीने भारताच्या कुरापती काढत राहणार असल्याचे यामुळे समोर आले आहे.

तर काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर संघर्षबंदीची मागणी करून दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी ही संघर्षबंदी पाकिस्तानच्या लष्कराने मोडली होती. यामुळे काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील परिस्थिती पुन्हा एकदा संवेदनशील बनली आहे. पाकिस्तानपुरस्कत दहशतवादी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यासाठी दबा धरून बसल्याचा दावा केला जातो.

पाकिस्तान व चीन या दोन्ही देशांनी हातमिळवणी करून एकाच वेळी भारतावर लष्करी दडपण वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर शत्रूंचा सामना करण्याची जय्यत तयारी भारतीय संरक्षणदलांनी ठेवलेली आहे. यासाठी संरक्षणसाहित्य व शस्त्रास्त्रांच्या खरेदीचा वेग वाढविण्यात आला आहे. यासाठी संरक्षण मंत्रालय आक्रमकपणे निर्णय घेत असून याचा फार मोठा लाभ देशाच्या संरक्षणदलांना मिळणार आहे. संरक्षणदलांसाठी केलेली ही गुंतवणूक देशासाठी अत्यंत लाभदायी ठरली, यामुळे डोकलाम आणि गलवानमध्ये भारतीय लष्कराला विजय मिळाल्याचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मोहान्ती यांनी नुकतेच म्हटले होते.

leave a reply