तुर्की नवे ऑटोमन साम्राज्य उभारण्याच्या तयारीत आहे

- सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

ऑटोमन साम्राज्यसंयुक्त राष्ट्र – ‘तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांना आखातापासून ते पूर्व भूमध्य क्षेत्रापर्यंत नवे ऑटोमन साम्राज्य उभे करायचे आहे. त्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा बाधित होऊ शकते. तुर्कीच्या परराष्ट्र धोरणाचे लष्करीकरण झालेले आहे’, असा इशारा सायप्रसचे परराष्ट्रमंत्री निकोस ख्रिस्तोडूलीड्स यांनी दिला. गेल्या वर्षी तुर्कीच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा ‘ग्रेटर तुर्की’चा प्लॅन सोशल मीडियावर उघड केला होता.

१४ व्या शतकापासून ते २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ऑटोमन साम्राज्य आग्नेय युरोप, उत्तर आफ्रिका ते पश्‍चिम आशियापर्यंत पसरलेले होते. या साम्राज्याचा विस्तार वर्तमानकाळातील इस्रायल, इजिप्तला व्यापून सौदी अरेबियाच्या दोन्ही सीमांपर्यंतही झाला होता. पहिल्या महायुद्ध काळात जर्मनीच्या बाजूने लढणार्‍या ऑटोमन साम्राज्याचे या महायुद्धात पराभव झाल्यानंतर तुकडे पडले. त्यानंतर मुस्ताफा अर्तातुर्क-केमाल पाशा यांनी आत्ताच्या आधुनिक तुर्कीची निर्मिती केली होती.

युरोप आणि आखाती देशांना जोडणार्‍या तुर्कीने दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात आधुनिक विचारसरणीचा अवलंब केला होता. पण गेल्या दशकभरात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीची सत्ता हाती घेतल्यापासून त्यांना ऑटोमन साम्राज्याप्रमाणे तुर्कीचा विस्तार करण्याची स्वप्ने पडू लागल्याचा दावा केला जातो. सायप्रसचे परराष्ट्रमंत्री निकोस यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या या महत्त्वाकांक्षेवर बोट ठेवले.

‘शेजारी देशांबरोबर कुठल्याही प्रकारचे वाद घालायचे नाहीत, असे तुर्कीचे आधीचे धोरण होते. पण एर्दोगन यांच्या राजवटीत तुर्कीने सर्वच शेजारी देशांबरोबर सीमावाद पेटविला आहे. तुर्कीला या क्षेत्रात वर्चस्व गजवायचे असून यासाठी तुर्की नवे ऑटोमन धोरण लागू करीत आहे’, अशी टीका परराष्ट्रमंत्री निकोस यांनी केली. साम्राज्यवादी धोरण स्वीकारणार्‍या तुर्कीपासून फक्त सायप्रसला धोका नाही. तर इस्रायलसह इजिप्त, सिरिया, इराक, लिबिया आणि इतर अरब देशांच्या सुरक्षेलाही धोका असल्याचा इशारा सायप्रसचे परराष्ट्रमंत्री निकोस यांनी दिला आहे.

ऑटोमन साम्राज्ययासाठी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी नुकत्याच केलेल्या घोषणेचे परराष्ट्रमंत्री निकोस यांनी आठवण करून दिली. सायप्रसपासून बळकावलेल्या उत्तर सायप्रसच्या भूभागामध्ये तुर्की ड्रोनचे तळ उभारत आहे. इस्रायल, इजिप्त तसेच आखाती देशांवर नजर ठेवण्यासाठी या ड्रोन तळाचा वापर करण्याचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा इरादा असल्याचे निकोस म्हणाले. तुर्कीच्या या धोक्याविरोधात सायप्रस इस्रायल आणि इजिप्त या शेजारी देशांबरोबर संरक्षण सहकार्य वाढविणार असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री निकोस यांनी दिली.

सायप्रसरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या या आरोपांवर तुर्कीने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याआधीही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या धोरणांवर विस्तारवादासंबंधी झालेले आरोप तुर्कीने फेटाळले होते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये इराक-सिरियाच्या कुर्दबहुल भागातील तुर्कीच्या लष्कराची घुसखोरी व लिबियातील कट्टरपंथियांना समर्थन देऊन राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांना ११ व्या शतकाप्रमाणे ऑटोमन साम्राज्याचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी ग्रेटर तुर्कीची योजना एर्दोगन यांनी आखल्याचे सत्ताधारी पक्षातील मेतिन कुलूंक यांनी गेल्या वर्षी म्हटले होते. ११ व्या शतकात सेलिकसचे साम्राज्य इराकच्या बगदादपासून ते ग्रीस-बल्गेरियापर्यंत विस्तारले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्षेवधी ठरत आहे.

leave a reply