शस्त्रसज्ज निदर्शक इराणमधील राजवट उलथून टाकतील

- अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन

इराणमधील राजवट

लंडन/तेहरान – गेल्या दीड महिन्यापासून इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात आंदोलन पुकारणारे निदर्शक स्वत:हून शस्त्रसज्ज बनत आहेत. ते इराणच्या बसिज मिलिशियाच्या जवानांकडून शस्त्रे हिरावून घेत आहेत. इराकमधील कुर्द गटांकडूनही इराणमधील निदर्शक शस्त्रास्त्रांची तस्करी करीत आहेत. आम्ही फक्त निदर्शनेच नाही तर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी देखील संघर्ष करू शकतो, असा संदेश निदर्शकांनी दिला आहे. यामुळे इराणमधील राजवट असुरक्षित बनली आहे, असा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला.

लंडनस्थित पर्शियन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जॉन बोल्टन यांनी इराणमधील घडामोडींबाबत लक्षवेधी माहिती दिली. ‘इराणमधील निदर्शकांनी स्वत:ला शस्त्रसज्ज करून आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीविरोधात पद्धतशीरपणे पावले उचलली आहेत. फक्त निदर्शनेच नाही तर वेळ पडल्यास इराणच्या राजवटीविरोधात शस्त्रांचा वापर करण्याची तयारीही निदर्शकांनी ठेवली आहे’, असे बोल्टन यांनी म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सबरोबर कारवाई करणाऱ्या बसिज मिलिशिया या गटाकडून निदर्शकांनी शस्त्रास्त्रे हिसकावून घेतल्याचा दावा अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केला.

इराणमधील राजवटतर इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील गट इराणमधील सरकारविरोधी गटांना शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचे बोल्टन पुढे म्हणाले. पण बोल्टन यांची मुलाखत घेणाऱ्या इराणीवंशाच्या ब्रिटिश महिला पत्रकारने निदर्शक शस्त्रसज्ज होत असल्याचे दावे फेटाळले. याबाबत कुठलेही पुरावे नसल्याचा दावा या महिला पत्रकाराने केला. यावर बोल्टन यांनी सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेले फोटोग्राफ्स, व्हिडिओज्‌‍ तसेच माहितीचा दाखला दिला. इराणमधील निदर्शकांनी बसिज मिलिशियावर हल्ला चढवून त्यांची शस्त्रास्त्रे काढून घेतल्याची आठवण बोल्टन यांनी करून दिली. तसेच कुर्दिस्तानमधील जनता इराणच्या राजवटीची दडपशाही अजिबात खपवून घेणार नसल्याचा इशारा बोल्टन यांनी दिला.

यापुढेही इराणमधील निदर्शने अशीच सुरू राहिली तर लवकरच या देशातील राजवट बदलेल, असा विश्वास बोल्टन यांनी व्यक्त केला. यासाठी अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इराणमध्ये याआधी भडकलेल्या निदर्शनांची आठवण करून दिली. स्वत:ला शस्त्रसज्ज करून हे निदर्शक इराणच्या राजवटीला इशारा देत असल्याचा दावा बोल्टन यांनी केला.

दरम्यान, इराणच्या राजवटीने बोल्टन यांच्या विधानांची गंभीर दखल घेतली आहे. तसेच इराणला लवकरच हुकूमशहांच्या तावडीतून मुक्त करू, स्वतंत्र करू, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली होती. याकडेही इराणची माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply