इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील आंदोलनाला इतर शहरांमधूनही समर्थन

इतर शहरांमधूनही समर्थनपॅरिस – इराणच्या सुरक्षा यंत्रणेविरोधात सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सुरू असलेल्या आंदोलनाला इराणच्या इतर शहरांमधूनही समर्थन मिळू लागले आहे. महिनाभरापूर्वी येथील झाहेदान शहरात सुरक्षा यंत्रणेने स्थानिकांवर केलेल्या गोळीबारात 30 हून अधिक जणांचा बळी गेला होता. त्यानंतर येथील संघर्षात बळी गेलेल्यांची संख्या 118 वर पोहोचल्याचा दावा केला जातो.

माहसा अमिनी या कुर्द तरुणीच्या हत्येनंतर इराणमध्ये सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्याविरोधात निदर्शने भडकली होती. यानंतर साधारण दोन आठवड्यांनी, 30 सप्टेंबर रोजी सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील झाहेदान शहरात पोलीस कमांडरने 15 वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. यानंतर संतप्त स्थानिकांनी झाहेदान शहरात सुरक्षा यंत्रणेविरोधात निदर्शने केली. यानंतर इराणच्या सुरक्षा यंत्रणेने केलेल्या गोळीबारात किमान 30 निदर्शकांचा बळी गेला होता.

रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी आरोपी अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. पण त्यानंतरही झाहेदान शहरातील संघर्ष थांबलेला नाही. गेल्या 40 दिवसांमध्ये येथील संघर्षात 118 जणांचा बळी गेला असून इराणच्या गुप्तचर यंत्रणेचा वरिष्ठ अधिकारी देखील या निदर्शनांदरम्यान ठार झाला होता. इराणच्या राजवटीने याचा सूड घेण्याची धमकी दिली होती.

इराणच्या इतर शहरांमध्ये सुरू असलेले राजवटविरोधी आंदोलन आणि झाहेदान शहरातील निदर्शने यांचा संबंध नव्हता. पण बुधवारी इराणच्या कुर्दिस्तान भागातील बानेह, केरमानशाह, मारिवान, सनांदज आणि साकेझ या शहरांमध्येही झाहेदानमधील निदर्शकांच्या समर्थनार्थ नवी निदर्शने सुरू झाली आहेत. सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात बलूच अल्पसंख्यांक असून गेली कित्येक दशके या भागातून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत आहेत. इराणसह अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये विभागलेल्या बलूच प्रांतांना एकसंघ बलुचिस्तान देश म्हणून मान्यता मिळावी, असे या बलूच नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी इराणच्या वायव्येकडील कुर्दवंशियांच्या भागातूनही आता स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी जोर पकडत आहे.

leave a reply