लडाखच्या सीमेवर लष्कर व वायुसेनेची सक्रियता कायम

Ladakh-AirForceनवी दिल्ली – लडाखच्या गलवान व्हॅलीतील चीनचे लष्कर सुमारे दोन किमी पर्यंत मागे गेले आहे. असे असले तरी, भारताची करडी नजर इथल्या सीमाक्षेत्रात रोखलेली असल्याचा संदेश वायुसेनेने दिला आहे. सोमवारी रात्री या क्षेत्रातून गस्त घालून हवाईतळावर परतत असलेल्या लढाऊ विमानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. यावेळी कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी वायुसेना सज्ज आहे, असा इशारा वायुसेनेने दिला आहे.

चीनचे जवान गलवान व्हॅलीतून सुमारे दोन किमी पर्यंत मागे सरकल्याचे उघड झाले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही ही बाब मान्य केली. हा भारताचा फार मोठा विजय ठरतो, असे माजी लष्करी व राजनैतिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असे असले तरी, चीनची ही माघार अल्प काळासाठी असू शकते व पुढच्या काळात संधी मिळाल्यास चीन पुन्हा घुसखोरी केल्यावाचुन राहणार नाही, असेही या माजी लष्करी व राजनैतिक अधिकाऱ्यांनी बजावले आहे. म्हणूनच भारताने आपल्या भूमिकेत बदल न करता चीनवरील लष्करी व इतर पातळ्यांवरील दडपण कायम ठेवलेच पाहिजे, अशी मागणी या माजी अधिकाऱ्यांनी केली आहे.

Ladakhदरम्यान, चीनचे समोर खडे ठाकलेले असताना, भारतीय लष्कराने लडाखच्या सीमाभागात तीन मोक्याच्या ठिकाणी पुलांची उभारणी व अद्ययावतीकरण केले आहे. यामुळे लष्करासाठी आवश्यक संरक्षण साहित्याची वाहतुक अधिक सुलभतेने करणे शक्य होईल. याचा फार मोठा लाभ लष्कराला मिळणार आहे.

पुढच्या काळातही सरकार चीनलगतच्या रस्त्यांच्या बांधणीला प्राथमिकता देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’चे (बीआरओ) प्रमुख लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांच्याशी चर्चा केली. तासभर चाललेल्या या चर्चेत चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तसेच पाकिस्तान बरोबरील नियंत्रण रेषेवर रस्त्यांचे जाळे उभे करण्यासंदर्भातील प्रकल्पांची माहिती ‘बीआरओ’च्या प्रमुखांनी संरक्षणमंत्र्यांना दिली.

leave a reply