देशातील कोरोनाबाधितांची संख्या सात लाख ४० हजारांवर

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७ लाख ४० हजारांवर पोहोचली आहे. मंगळवारी महाराष्ट्रात २२४ जण दगावले आणि ५१३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुबंईत चोवीस तासात ८०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ६४ जण दगावले आहेत. यामुळे मुंबईतील या साथींच्या एकूण बळींची संख्या ४ हजार ९९९ वर पोहोचली आहे.

Corona -Indiaदेशात सोमवारापासून मंगळवारच्या सकाळपर्यंत सुमारे ४६७ जण दगावले आणि २२,२५२ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशात या साथीने दगावणाऱ्यांची संख्या २० हजार १६० वर पोहोचली आणि रुग्णांची संख्या ७ लाख १९ हजारांच्या पुढे गेली. तर रात्रीपर्यंत देशात आणखी सुमारे ४०० बळींची नोंद झाल्याचे आणि जवळपास २० हजार नवे रुग्ण आढळल्याचे राज्यांकडून जाहीर माहितीनुसार स्पष्ट होते. महाराष्ट्रातच चोवीस तासात २२४ बळी गेले आहेत.

तामिळनाडूत दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू झाला आणि ३,११६ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत २००८ नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात १५ जण दगावले आणि १४९८ नव्या रुग्णांची नोंद झाली. गुजरातमध्ये दिवसभरात १७ जणांचा बळी गेला आणि ७७८ नवे रुग्ण आढळले. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या या पाचही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मंगळवारी कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सरकारने या साथीचा फैलाव रोखण्यासाठी सुरुवातीपासून जे धोरण स्वीकारले त्यामुळे देशात कोरोनाच्या साथीचा उंचावणारा आलेख थोपविता आला, असे म्हटले आहे. सध्या भारत कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण असलेल्या देशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र भारतात रुग्ण सापडण्याचा दर आणि मृत्यू दर कमी आहे, याकडे हर्ष वर्धन यांनी लक्ष वेधले.

leave a reply