लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांचा पुण्यात दहशतवादविरोधी सराव

पुणे – भारतीय लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांचा ‘सुरक्षा कवच’ हा संयुक्त दहशतवादविरोधी सराव पार पडला. भारतीय लष्कराच्या ‘४१ आर्टिलरी विभागाने या सरावाचे आयोजन केले होते. दहशतवादी कारवायांना सामोरे जाताना दहशतवादविरोधी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (क्यूआरटी) सक्रिय करण्यासाठी लष्कर आणि पोलीस यांच्यामध्ये समन्वय साधणे हे या अभ्यासाचे उद्दीष्ट होते.

भारतीय लष्कराच्या दक्षिण विभागाचे ४१ आर्टिलरी पथक (अग्निबाझ विभाग) आणि महाराष्ट्र पोलिसांनी नऊ ऑक्टोबर रोजी ‘ऑपरेशन सुरक्षा कवच’ या संयुक्त सरावाचे आयोजन केले होते. या सरावात लष्करच्या आणि पोलिसांच्या ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ सहभागी झाल्या होत्या. तसेच लष्कराचे श्वान पथक, लष्कराचे बॉम्बस्कॉड, पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि महाराष्ट्र शीघ्र कृती दलाच्या तुकड्या सहभागी झाल्या होत्या.

पुण्याच्या लुल्लानगर भागात हा सराव झाला. यावेळी एका घरात दहशतवादी लपल्याचा देखावा निर्माण करण्यात आला होता. या दहशतवाद विरोधी सरावात लष्कर आणि पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला. डॉग स्कॉडद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. यानंतर बाँम्ब शोधक पथकाने दहशतवाद्यांनी लपवलेली स्फोटके निकामी केली.

या सरावादरम्यान वाहतूक पोलीस आणि लष्कराच्या पोलीस दलाने जवळपासच्या वाहतूकीचे एकत्रित नियंत्रण केले. सरावानंतर स्थानिकांसाठी लष्कर आणि पोलीसांच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हा संपूर्ण सराव कोविड१९ चे सर्व नियमांचे पालन करीत पार पडला. या सरावामुळे महाराष्ट्र पोलीस व भारतीय लष्कराला एकमेकांच्या कार्यपध्दतीचे आदान प्रदान करण्याची संधी मिळाली.

leave a reply