म्यानमारचे लष्कर आणि अराकन दहशतवाद्यांमध्ये संघर्ष पेटला

सित्वे – गेल्या ४८ तासांपासून म्यानमारचे लष्कर आणि अराकन या दहशतवादी गटामध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. राखिन प्रांतातील डोंगराळ भागात सुरू असलेल्या या संघर्षात म्यानमारने आपल्या लष्कराबरोबर हवाईदल आणि नौदलही उतरविले आहे. म्यानमारचे संरक्षणदल या दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करीत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर अराकनच्या दहशतवाद्यांनी राखिन प्रांतातून तीन नेत्यांचे अपहरण केल्याची बातमीही समोर आली आहे. अराकन दहशतवाद्यांपासून भारत-म्यानमारच्या सीमेलाही धोका असून या दहशतवाद्यांना चीनकडून शस्त्रपुरवठा होत असल्याचे याआधी उघड झाले होते.

२०१८ सालापासून म्यानमारचे लष्कर आणि अराकन या दहशतवादी गटात संघर्ष सुरू आहे. म्यानमारच्या सरकारने राखिन प्रांत वगळता देशभरात संघर्षबंदी लागू केली आहे. अराकनच्या दहशतवाद्यांच्या म्यानमारी सरकारविरोधातील कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दहशतवाद्यांना संपवून राखिन प्रांत मुक्त करण्याची घोषणा म्यानमारच्या सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर, गेल्या दोन आठवड्यांपासून म्यानमारच्या लष्कराने अराकनच्या दहशतवाद्यांवर हल्ले सुरू केले असून मंगळवारपासून या हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचा दावा स्थानिक करीत आहेत.

राखिन प्रांतातील आँगथार्झी गावात हे हल्ले सुरू आहेत. म्यानमारच्या लष्कराने अराकन दहशतवाद्यांच्या चौक्या तसेच छुप्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. तर म्यानमारच्या हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी येथील अराकनच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत. आतापर्यंत म्यानमारने या दहशतवाद्यांविरोधात हेलिकॉप्टर्सचा वापर केला होता. पण पहिल्यांदाच लढाऊ विमानाचा वापर करून म्यानमारच्या लष्कराने या कारवाईची गांभीर्य अधोरेखित केले आहे. या व्यतिरिक्त म्यानमारच्या नौदलाच्या गस्तीनौकांनी नद्यांवाटे प्रवास करुन अराकन दहशतवाद्यांवर स्वतंत्र कारवाई केली आहे. या कारवाईत अराकनला जबर हानी सोसावी लागल्याचा दावा स्थानिक करीत आहेत.

अराकन दहशतवाद्यांपासून आपल्या सीमासुरक्षेलाही धोका असल्याचा इशारा भारताच्या लष्कराने याआधी दिला होता. या अराकनच्या दहशतवाद्यांना चीनकडून शस्त्रपुरवठा होत असल्याचे जुलै महिन्यात उघडही झाले होते. तेव्हा म्यानमारच्या लष्कराने या दहशतवाद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भारताने याआधी म्यानमारकडे केली होती. दहा दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्यानमारचा दौरा केला होता.

leave a reply