लष्करप्रमुख जनरल नरवणे यांची लडाखला भेट

नवी दिल्ली – लडाखमध्ये भारत-चीनमधील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लडाखचा दौरा केला आहे. शुक्रवारी नरवणे यांनी लेहमधील लष्कराच्या १४ कोरच्या मुख्यलायला भेट दिली. त्यानंतर त्यांनी नॉर्थन कमांडच्या प्रमुख अधिकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि लडाखमधील सज्जतेचा आढावा घेतला. गेल्या तीन आठवड्यात लडाखमध्ये चार ठिकाणी चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न केले, तसेच सीमेवर आपल्या जवानांची तैनातीही वाढविली आहे. भारतानेही त्यानंतर लडाखमध्ये सैनिकांच्या तैनातीत वाढ केली असून यापार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांची लडाख भेट अत्यंत महत्वाची ठरते.

नुकतेच लडाख, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने घुसखोरीचे प्रयत्न केले होते. यामध्ये लडाख आणि सिक्कीममध्ये दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले होते आणि दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटही झाली होती. गेल्या तीन आठवड्यात लडाखमध्ये चार ठिकाणी चीनने घुसखोरीचे प्रयत्न केल्याचा बातम्या येत आहेत. पॅंगोग सरोवर क्षेत्राबरोबर गोगरा आणि पॉईंट १४ या व्यूहरचनात्मकदृष्टया महत्वाच्या भागात चिनी सैनिकांनी घुसखोरी केली असून गलवान नाला ते पॉईंट १४ दरम्यान चीन खंदक खणत असल्याचे आणि येथे चिनी सैनिकांनी तंबू ठोकल्याच्या बातम्या येत आहेत.

लडाखमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपण राजनैतिक पातळीवर भारताशी चर्चा करीत असल्याचे म्हटले असले, तरी सीमेवर चीन आक्रमक आणि चिथावणीखोर कारवाया करीत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या चार महिन्यात चीनने १७० वेळा भारतीय सीमेत घुसखोरीची प्रयत्न केले. यातील १३० प्रयत्न लडाखमध्ये झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

नुकतेच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या दक्षिण आणि मध्य आशियाच्या उपमंत्री एलिस वेल्स यांनी लडाखमधील तणावाला चीनची चिथावणीखोर वृत्ती जबाबदार असल्याचे सांगून भारताची बाजू घेतली होती. भारताकडून सीमा क्षेत्रात केला जाणारा पायभूत सुविधांचा विकास थांबविण्यासाठी चीन भारतावर दडपण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. भारताने पाकिस्तानला गिलगिट बाल्टिस्तान खाली करण्यास सांगतले होते. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबाराच्या आणि दहशतवाद्यांना घुसखोरीत सहाय्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याचवेळी चीनने पूर्व सीमांवर या कुरापती सुरु केल्या. त्यामुळे विश्लेषक चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया सुनियोजित असल्याचे दावे करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी लडाखचा दौरा केला. या लडाख भेटीतून लष्करप्रमुखांनी भारत अशा दडपणाला जुमानणार नाही, चीनच्या हालचालींवर भारताची करडी नजर आहे असा स्पष्ट संदेश दिल्याचे दिसत आहे.

leave a reply