देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख ३० हजारांवर

नवी दिल्ली – देशात तीन दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८ हजारांनी वाढली आहे. शुक्रवारपासून शनिवारच्या सकाळपर्यंत तब्बल ६,६५४ नवे रुग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सव्वा लाखांवर पोहोचल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या १,३०,००० पर्यंत पोहोचल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात शनिवारी या साथीने आणखी ६० जण दगावले, तर २,६०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या ४७ हजारांच्या पुढे गेली आहे. सिक्कीममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून लॉकडाऊन शिथिल केल्यावर केरळमध्ये पुन्हा कोरोना संक्रमण वाढल्याचे दिसत आहे.

देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ४० टक्क्यांच्या पुढे गेला आहे, ५० हजारांहून अधिक जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र त्याचवेळी नवे रुग्णही झपाट्याने सापडत असल्याने देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. शुक्रवारपासून शनिवारच्या सकाळपर्यंत १३७ जण दगावले, तर ६,६५४ नवे रुग्ण आढळले. चोवीस तासात इतके कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा हा नवा उच्चांक आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

तसेच शनिवारी रात्री विविध राज्यांकडून दिवसभरात सापडलेल्या नव्या रुग्णांची संख्या जाहीर करण्यात आली. त्यावरून शनिवारी रात्रीपर्यंत देशातील रुग्णांची संख्या १,३०,००० पर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होते. १ मे पासून देशात कोरोनाने सुमारे २६०० जणांचा बळी घेतला असून रुग्णसंख्या ९३ हजारांनी वाढली आहे.

महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ६० जणांचा या साथीमुळे बळी गेला आणि २,६०८ नवे रुग्ण आढळले. राज्यात एकाच दिवसात दोन हजारांहून अधिक रुग्ण सापडण्याचा हा सलग सातवा दिवस आहे. मुंबई चोवीस तासात ४० जण दगावले, तर १५६६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतील या साथीच्या रुग्णांची संख्या २९ हजरांजवळ पोहोचली आहे. गेल्या १४ दिवसात मुंबईतील रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. १० मे रोजी राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४ हजरांजवळ पोहोचली होती.

महाराष्ट्रात या संकट काळात सेवा बजाविणाऱ्या पोलिसांना होणारी कोरोनाची लागण हा फार मोठा चिंतेचा विषय ठरतो. राज्यात आतापर्यंत १८ पोलीस या साथीमुळे दगावले आहेत, तर १६७१ पोलिसांना या साथीची लागण झाली आहे. यामध्ये १७४ पोलीस अधिकारी आहेत. तसेच देशात ३५० सीआरपीएफ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

दरम्यान, देशातील पाच राज्यांमध्येच ७७ टक्के रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रसह, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये रुग्ण संख्या जास्त आहे.

शुक्रवारी तामिळनाडूत ७५९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर दिल्लीत कोरोनाचे ५९१ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकने शुक्रवारी २०० रुग्ण आढळल्याचे माहिती जाहीर केली आहे.

leave a reply