लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला सज्जड इशारा

नवी दिल्ली – हजार वार करून भारताला रक्तबंबाळ करण्याचे पाकिस्तानचे धोरण कायम राहणार असेल तर भारत पाकिस्तान वर एक हजार एक वार करील, अशा सणसणीत शब्दात भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला समज दिली. मागच्या काही दिवसांपासून काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार सुरू आहे. याला भारतीय लष्कराकडून सडेतोड प्रत्युत्तर दिले जात असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी भारतीय लष्कराकडे पाकिस्तान पेक्षाही अधिक हल्ले चढवण्याची क्षमता असल्याची जाणीव करून दिली आहे. त्याचवेळी भारताला पाकिस्तान व चीन यासारख्या घातकी देशाचा शेजार लाभलेला आहे. व हे शेजारी बदलता येत नाहीत, असा मार्मिक टोला लष्करप्रमुखांनी एका मुलाखतीत लगावला आहे.

बुधवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी काश्मीरच्या नियंत्रणरेषेला भेट दिली. यावेळी भारतीय लष्कर सीमेवर गोळीबार करीत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केला. तसेच पाकिस्तानच्या लष्कराकडून भारताला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा जनरल बाजवा यांनी यावेळी दिला. पाकिस्तानच्या माध्यमांनी नेहमीप्रमाणे भारताच्या विरोधात कांगावा सुरु केला आहे. भारतीय लष्कराच्या गोळीबारात पाकिस्तानचे जवान आणि सर्वसामान्य नागरिक ठार होत आहेत, असा ओरडा पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्या करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी भारताची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. ऐंशीच्या दशकापासून पाकिस्तानने भारताच्या विरोधात दहशतवादाचा वापर करून छुपे युद्ध पुकारले होते. ‘ब्लीड इंडिया बाय थाऊंजड कटस्’ अर्थात हजार वार करून भारताला रक्तबंबाळ करा हे पाकिस्तानच्या लष्कराचे त्यावेळचे घोषवाक्य बनले होते. त्याचा संदर्भ देऊन जनरल नरवणे यांनी पाकिस्तानी लष्कराला धडकी भरविणारे प्रत्युत्तर दिले आहे. जर भारतावर हजार वार करून रक्तबंबाळ करण्याचे हे धोरण पाकिस्तान कायम ठेवणार असेल तर भारत पाकिस्तानवर एक हजार एक वार करील, असा इशारा भारताच्या लष्कर प्रमुखांनी दिला आहे.

जनरल नरवणे यांनी या मुलाखतीत कोरोनाव्हायरसच्या विरोधात भारतीय लष्कराच्या सज्जतेची माहिती दिली. भारतीय लष्कर जागतिक आणि अंतर्गत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. तसेच भारतीय लष्करामध्ये अण्विक, रासायनिक आणि जैविक युध्दाच्या काळात कर्तव्य बजावण्याची क्षमता आहे, असे सूचक विधान लष्करप्रमुखांनी केले. पाकिस्तान आपल्या हस्तकांचा वापर करून भारतात कोरोनाव्हायरसची साथ पसरविण्याचे कुटील कारस्थान आखत असल्याचे अहवाल समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करप्रमुखांनी केलेले हे विधान लक्षवेधी ठरते.

कोरोनाव्हायरसच्या साथीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असून अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. जनरल नरवणे यांनी सदर मुलाखतीत ही बाब मान्य केली. या पार्श्वभूमीवर संरक्षण खर्चात कपात करण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सुरक्षित देश समृद्धीच्या दिशेने जोमाने वाटचाल करू शकतो, असे सांगून लष्करप्रमुखांनी आपले परखड मत मांडले आहे.’ मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण दलासाठी अत्यावश्यक असलेल्या शस्त्रास्त्र व संरक्षण साहित्याची निर्मिती देशांतच झाली तर त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, याकडेही लष्करप्रमुखांनी या मुलाखतीत लक्ष वेधले आहे.

leave a reply