कोरोनाव्हायरस चीनच्या वुहान प्रयोगशाळेतच विकसित करण्यात आला

- चिनी संशोधिकेच्या दाव्याने खळबळ

लंडन – सार्ससारख्या भयंकर विषाणूची साथ जगभरात फैलावेल, असा इशारा वर्षभरापूर्वी एका चिनी संशोधिकेने दिला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. ‘शी झेंग्ली’ असे नाव असलेले या संशोधिकेने वुहानच्या प्रयोगशाळेत त्यावर काम सुरू असल्याचे एका माहितीपटात म्हटले होते. मात्र वुहानच्या प्रयोगशाळेतील वरिष्ठांनी ही माहिती दडविली. मात्र २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या या माहितीपटातील इशारा आता जगासमोर आला असून यामुळे कोरोनाव्हायरसबाबतची माहिती लपवणाऱ्या चीनचा पर्दाफाश झाला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय टीकेचे लक्ष्य ठरलेल्या ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या वादग्रस्त प्रयोगशाळेची डॉक्युमेंट्री पाश्चिमात्य माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. चीनच्या सरकारी वृत्तवाहिनी ‘सीसीटीव्ही’ने तयार केलेल्या या डॉक्युमेंट्रीमुळे काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. २०१८ सालच्या या डॉक्युमेंट्रीत सदर प्रयोगशाळेत काही विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचे दाखविण्यात आले आहे. या प्रयोगशाळेतच कोरोनासंबंधित विषाणूवर संशोधन सुरू असल्याचे माहितीपटामुळे स्पष्ट झाले आहे.

यात चीनमधून उदयाला आलेल्या आणि २००२ सालापासून चीन आणि जगभरात पसरलेल्या ‘सार्स’, ‘एसएडीएस कोरोनाव्हायरस’ आणि ‘मर्स’ तसेच सुमारे १५०० विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचा दावा या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला होता. या डॉक्युमेंट्रीमध्ये ‘शी झेंग्ली’ या आघाडीच्या संशोधिकेचाही समावेश होता. या डॉक्युमेंट्रीनंतर झेंग्ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना इशारा देणारा अहवाल सुपूर्द केला होता.

‘सार्स’, एसएडीएस कोरोनाव्हायरस’ आणि ‘मर्स’ या तीन विषाणूंच्या वापराने समोर येणारा नवा कोरोनाव्हायरस अधिक जीवघेणा ठरू शकतो, असे झेंग्ली यांनी बजावले होते. मानवातून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या या विषाणूची जनुके ‘सार्स-सीओव्ही-२’ अशी असतील, असेही झेंग्ली यांनी स्पष्ट केले होते. चीनच्या अफाट लोकसंख्येमुळे या विषाणूचा फैलाव अधिक दूरवर होईल, अशी भयावह शक्यता झेंग्ली व त्यांच्या सहकाऱ्यांनी वर्तविली होती.

पण चीन सरकारच्या आदेशांनी काम करणाऱ्या या प्रयोगशाळेच्या प्रमुखांनी झेंग्ली यांचा इशारा धुडकावला होता. मात्र, चिनी वृत्तवाहिनीची डॉक्युमेंट्री आणि झेंग्ली यांचा इशारा नव्याने समोर आल्यामुळे चीनचे कारस्थान उघड झाले आहे. कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहानमधूनच झाल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान व तैवान हे देश करू लागले असून त्याला या माहितीमुळे दुजोरा मिळू लागला आहे. तर चीनच्या वुहान प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती झाल्याचा ठपका ठेवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाव्हायरसच्या उगमाचा अमेरिका सखोल तपास करीत असून या तपासात जर ही साथ चीनने जाणीवपूर्वक पसरविली हे सिद्ध झाले, तर चीनला त्याचे भयंकर परिणाम भोगायला लागतील, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया हे देश देखील वेगवेगळ्या शब्दात चीनला असेच इशारे देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, चीनच्याच वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेला माहितीपट या देशाचे कारस्थान उघड करणारा ठरतो आहे. कोरोनाव्हायरसची साथ म्हणजे चीनच्या जैविक युद्धाचा भाग असल्याचा आरोप यामुळे अधिकच तीव्र होणार आहे.

leave a reply