हैतीतील प्रलयंकारी भूकंपात किमान 724 जणांचा बळी

- शेकडो नागरिक अजूनही बेपत्ता

724 जणांचा बळीलेस केयेस – मध्य अमेरिकेतील हैती शनिवारी 7.2 रिश्‍टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले असून यामध्ये 724 जणांचा बळी गेला. हैतीच्या ‘सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सी’ने ही माहिती दिली. अजूनही शेकडो नागरिकांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक यंत्रणा सांगत असून यामुळे बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान, ग्रेस चक्रीवादळ हैतीच्या दिशेने वेगाने सरकत असून या देशावरील संकट अधिकच भयावह स्वरुप धारण करीत असल्याचे दिसत आहे.

कॅरेबियन समुद्रातील हैती या बेटदेशाचा नैऋत्य भाग या भूकंपाचे केंद्र ठरेल. या भूकंपात 304 जणांचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण स्थानिक बचावगटाने मृतांची संख्या दुप्पटीहून अधिक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर किमान 2800 जण जखमी झाले आहेत. राजधानी पोर्ट-अउ-प्रिन्सपासून 125 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागातील 700 इमारती कोसळल्या. यामध्ये शाळा आणि रुग्णालयांच्या इमारतींचाही समावेश आहे. तर 3,778 घरे जमिनदोस्त किंवा त्यांची मोठी पडझडझाली. काही ठिकाणी रस्त्यांना मोठ्या भेगा गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे येतअसल्याचे स्थानिक यंत्रणा सांगत आहेत.

724 जणांचा बळीस्थानिक पुढे येऊन ढिगारा उपसण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करीत आहेत. हैतीचे पंतप्रधान एरिल हेन्री यांनी देशभरात एका महिन्यासाठी आणीबाणी जाहीर केली. भूकंपातील नुकसानाची पूर्ण कल्पना येईपर्यंत आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी आवाहन करणार नसल्याचे पंतप्रधान हेन्री म्हणाले. त्यातच 16 आणि 17 ऑगस्ट रोजी हैतीच्या किनारपट्टीला ग्रेस चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा इशारा अमेरिकेच्या भूभौतिकशास्त्रज्ज्ञ विल्यम बर्नहार्ट यांनी दिला. त्यामुळे हैतीच्या सरकार आणि जनतेने दुहेरी संकटासाठी तयार रहावे, असे बर्नहार्ट म्हणाले. तर या आपत्तीमुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. दरम्यान, 2010 साली हैती सर्वात भीषण भूकंपाने हादरले होते. हा भूकंप व त्याबरोबर आलेल्या आपत्तीमध्ये तीन लाख जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

leave a reply