अमेरिकेबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीन व रशियाकडून लष्करी सहकार्य वाढविण्याची घोषणा

लष्करी सहकार्यबीजिंग/मॉस्को – चीन व रशियाने लष्करी सहकार्य वाढविण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी दोन देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाल्याची संबंधित देशांच्या सूत्रांनी दिली. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया व भारताच्या ‘क्वाड’ गटातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीपाठोपाठ झालेली ही बैठक लक्ष वेधून घेणारी ठरते. चीन व रशियादरम्यान झालेल्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, हे दोन्ही देश अमेरिका व मित्रदेशांसाठी सामरिकदृष्ट्या मोठे आव्हान असल्याचा इशारा अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी दिला.

चीन व रशिया या दोन्ही देशांविरोधात सध्या अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांनी मोठी आघाडी उघडल्याचे चित्र समोर येत आहे. साऊथ चायना सी, व्यापारी लूट, सायबरहल्ले, हाँगकाँग व कोरोना यासारख्या मुद्यांवरून पाश्‍चात्य देशांनी चीनवर निर्बंध लादले आहेत. तर क्रिमिआ, आक्रमक लष्करी तैनाती, ॲलेक्सी नॅव्हॅल्नी, सायबरहल्ले यासारख्या मुद्यांवरून रशियाविरोधातही कारवाई करण्यात येत आहे. पाश्‍चात्य देशांकडून सुरू असलेल्या या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर चीन व रशिया अधिक जवळ येत असल्याचे दिसत आहे.

जून महिन्यात चीन व रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये ‘व्हर्च्युअल कॉन्फरन्स’ पार पडली होती. त्यावेळी रशिया व चीनमधील ‘फ्रेंडशिप ट्रिटी’च्या विस्तारामुळे दोन देशांमधील संबंध अभूतपूर्व उंचीवर पोहोचले आहेत, असा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला होता. तर रशिया-चीन संबंध हे आंतरराष्ट्रीय संबंधांच्या नव्या रचनेचे उदाहरण ठरते, असे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटले होते. त्यानंतर या महिन्यात दोन देशांमध्ये झालेला व्यापक लष्करी सराव संरक्षणक्षेत्रातील वाढत्या सहकार्याचे संकेत देणारी बाब ठरली आहे.

चीनमध्ये पार पडलेल्या ‘झॅपड/इंटरॅक्शन-2021’ नावाच्या या सरावात दोन्ही देशांच्या हजारो जवानांसह लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स, रणगाडे यांचा समावेश होता. सरावाच्या अखेरच्या दिवशी रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगु यांनी लष्करी शिष्टमंडळासह चीनला भेट दिली. यावेळी त्यांनी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहे यांच्यासह दोन देशांमधील संरक्षणसहकार्यासाठी चर्चा केली. यावेळी चीन व रशियामध्ये परस्परांमधील संरक्षणसहकार्य अधिक भक्कम करण्यावर एकमत झाल्याची माहिती संबंधित देशांच्या सूत्रांनी दिली. चीनचे सरकारी मुखपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाईम्स’ने चीन व रशियामधील सराव म्हणजे पाश्‍चात्य देशांना दिलेला रोखठोक संदेश असल्याचे बजावले आहे.

रशिया व चीनच्या या वाढत्या सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे दोन्ही देश मोठे आव्हान ठरु शकतात, असे बजावले आहे. ‘चीन जगातील सर्वात मोठे नौदल आहे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे हवाईदल आहे. चीन आपली आण्विक क्षमता व पारंपारिक संरक्षणदले मोठ्या प्रमाणात वाढवित आहे. चीन हायपरसोनिक्स क्षेपणास्त्रेही वेगाने विकसित करीत आहे. रशियाही आपल्या पारंपारिक व आण्विक क्षमतांचे वेगाने आधुनिकीकरण करीत असून, सायबरक्षमतांच्या माध्यमातून इतर देशांवर दबाव टाकण्यासाठी विविध माध्यमांचा अवलंब करीत आहे’, अशा शब्दात अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे प्रमुख ॲडमिरल चार्ल्स ए. रिचर्ड यांनी दोन्ही देशांचे मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट केले.

leave a reply