काबुल विमानतळावरील चेंगराचेंगरीत सात जणांचा बळी

- तालिबानने अमेरिकी लष्कराला जबाबदार धरले

चेंगराचेंगरीतकाबुल – तालिबानच्या जुलमी राजवटीपासून पळ काढण्यासाठी काबुल विमानतळावर झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणींचा बळी गेला. याबरोबर गेल्या आठवड्याभरात काबुल विमानतळावरील वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापर्यंत 20 जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. यासाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. तर काबुलमधील विमानतळापर्यंतचा प्रवास असुरक्षित बनल्याने अमेरिकन नागरिकांनी सध्या या विमानतळावर येऊ नये, अशी सूचना अमेरिकेने केली आहे.

चेंगराचेंगरीतअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी जाहीर केलेल्या अफगाणिस्तानातील पूर्ण माघारीसाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अमेरिकेसह सर्वच देशांचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही हजारो परदेशी नागरिक अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अडकले असून 31 ऑगस्टपर्यंत ही माघार शक्य नसल्याचा दावा पाश्‍चिमात्य विश्‍लेषक देत आहेत.

अशा परिस्थितीत, तालिबानने शनिवारी काबुल विमानतळाच्या बाहेरील तैनाती वाढविली. तालिबानचे दहशतवादी ठिकठिकाणी परदेशी नागरिकांची कसून चौकशी करीत असून यातील काहीजणांना मारहाण करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे काबुल विमानतळावर तणावाचे वातावरण आहे.

काही तासांपूर्वी लष्करी विमानाने उड्डाण करतेवेळी ‘फ्लेअर्स’ सोडले. विमानाला लक्ष्य करणाऱ्या रॉकेट किंवा क्षेपणास्त्राचा मारा चकवण्यासाठी अशाप्रकारे फ्लेअर्सचा वापर केला जातो. विमानावर रॉकेट किंवा क्षेपणास्त्र डागले होते का, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पण या घटनेनंतर विमानतळावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चेंगराचेंगरीतत्यात जिवावर उदार झालेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी करण्यासाठी तालिबानच्या दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाणींचा बळी गेल्याची माहिती ब्रिटनच्या लष्कराने दिली. विमानतळाची पूर्ण जबाबदारी अमेरिकेच्या हातात असून अफगाणींच्या बळींसाठी अमेरिकाच जबाबदार असल्याचा आरोप तालिबानच्या कमांडरने केला.

दरम्यान, अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांनी काबुल विमानतळासाठी प्रवास करू नये, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. ‘आयएस’चे दहशतवादी विमानतळासाठी प्रवास करणाऱ्या अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करू शकतात. त्यामुळे अमेरिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संपर्क केल्याशिवाय बाहेर पडू नका, अशी सूचना अमेरिकेच्या दूतावासाने केली आहे.

leave a reply