‘एटीएजीएस’ जगात सर्वात उत्तम यापुढे भारताला तोफांच्या आयातीची आवश्यकता भासणार नाही

- ‘डीआरडीओ’चा दावा

नवी दिल्ली – भारताने विकसित केलेली ‘अँडव्हान्स टोव्हेड आर्टिलरी गन सिस्टीम’च्या (एटीएजीएस) जगात सर्वात उत्तम आहे. यामुळे आता भारताला तोफांच्या आयतीची गरज भासणार नाही, असा दावा ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) केला आहे.

‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘एटीएजीएस’ या स्वादेशी बनावटीच्या हॉवित्झरच्या चाचण्या सतत सुरू आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या नगरमध्ये या तोफांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर नुकत्याच ओडीशातही चाचण्या पार पडल्या. याशिवाय चीनला लागून असलेल्या सिक्कीमच्या सीमेजवळ आणि पाकिस्तान सीमेनजीक पोखरणमध्ये या तोफांच्या कित्येक चाचण्यात पार पडल्या असून २००० हजार राऊंड फायर करण्यात आले आहेत.

आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये ‘डीआरडीओ’ची विकसित केलेली तोफ जगात सर्वात उत्तम असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बोफोर्स’ तोफा, इस्रायलच्या ‘अ‍ॅथोस’ आणि फ्रान्सच्या ‘नेक्सटर’ तोफांपेक्षाही स्वदेशी बनावटीची ही तोफ सरस असल्याचा दावा, ‘डीआरडीओ’च्या ‘एटीएजीएस’ प्रोजेक्टचे संचालक शैलेंद्र व्ही. गाडे यांनी केला आहे.

‘एटीएजीएस’ची मारक क्षमता ४८ किलोमीटर इतकी असून भारतीय लष्कराच्या सर्व आवश्यकतांची पूर्तता करण्यास ही तोफ सक्षम आहे. भारतीय लष्कराला १५०० तोफांची आवश्यकता आहे. याशिवाय १५० ‘एटीएजीएस’ आणि ११४ धनुष तोफांची मागणीही लष्करांनी नोंदविली आहे. यानुसार एकूण १८०० तोफांची मागणी भारतीय लष्कराने नोंदविली आहे. पण ‘एटीएजीएस’ ची कामगिरी आणि क्षमता पाहता भारतीय लष्कराला इतर तोफांकडे पाहण्याची आवश्यकता भासणार नाही. १८०० ‘एटीएजीएस’ तोफा भारतीय लष्कराच्या सर्व आवश्यकता पूर्ण करतील, असा विश्‍वास गाडे यांनी व्यक्त केला.

शत्रू आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण आपण त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात नसू, पण या तोफेच्या ४८ किलोमीटरच्या मारक क्षमतेमुळे आपण शत्रूपर्यंत नक्कीच पोहोचू, असा दावाही गाडे यांनी केला. चीन आणि पाकिस्तानकडे असलेल्या तोफांपेक्षा भारताच्या ‘एटीएजीएस’ची मारक क्षमता जास्त आहे. तसेच जगात इतर कोणत्याही देशाकडे या ‘एटीएजीएस’ यंत्रणेसारखे तंत्रज्ञान आणि अचूक मारक क्षमता नाही, ही गोष्ट गाडे यांनी अधोरेखित केली आहे.

भारतीय लष्कर सध्या १६०० तोफांच्या खरीदेचा विचार करीत आहे. यासाठी इस्रायलच्या ‘अ‍ॅथोस’चा विचार केला जात आहे. किमान ४०० तोफांची खरेदी त्वरीत करण्याची तयारी केली जात आहे. यापार्श्‍वभूमीवर गाडे यांनी ‘डीआरडीओ’ने विकसित केलेल्या ‘एटीएजीएस’च्या क्षमतेकडे लक्ष वेधले आहे. भारताने ८० च्या दशकांनंतर नव्या तोफांची खरेदी केली नव्हती. लष्कराला आवश्यकता असूनही नव्या तोफांच्या खरेदी रखडली होती. मात्र गेल्या पाच सहा वर्षात लष्कराच्या आवश्यकता वेगाने पूर्ण करण्याकडे भर देण्यात येत असून देशी शस्त्रांच्या विकास कार्यक्रमालाही गती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत १५५एएम/५२ कॅलिबरच्या ‘एटीएजीएस’ तोफा विकसित करण्यात आल्या आहेत. लवकरच त्या भारतीय लष्कराच्या ताफ्यात दाखल होतील, असे वृत्त आहे.

leave a reply