चीनच्या हवाई दलाची क्षमता प्रायोगिक पातळीवरची

- माजी वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ

नवी दिल्ली – लडाखच्या हवाई क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये संघर्ष उद्भवू शकतो. मात्र चीनच्या हवाई दलाची क्षमता अद्याप कुठल्याही युद्धात सिद्ध झालेली नाही. चीनची ही क्षमता केवळ प्रायोगिक पातळीवरचीच आहे, असे भारताचे माजी वायुसेनाप्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले आहे. वेगळ्या शब्दात प्रत्यक्ष संघर्षात चीनचे हवाई दल भारतासमोर टिकाव धरू शकणार नाही, हे माजी वायुसेनाप्रमुख सांगत आहेत. याआधी काही विश्‍लेषकांनी देखील ही बाब लक्षात आणून दिली होती व यात जबाबदार पाश्‍चिमात्य विश्‍लेषकांचाही समावेश आहे.

लडाखच्या एलएसीवर भारतीय वायुसेनेची स्थिती खूपच मजबूत आहे. त्यातच वायुसेनेने या क्षेत्रातील आपल्या क्षमतेत झपाट्याने वाढ केली असून इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वायुसेना वर्चस्व गाजवित असल्याचे वायुसेनाप्रमुख आर.के.एस भदौरिया यांनी घोषित केले होते. याच्याही पुढे जाऊन माजी वायुसेनाप्रमुख धनोआ यांनी लडाखच्या हवाई क्षेत्रात चीनसमोर रसद व अत्यावश्यक गोष्टींच्या पुरवठ्याची समस्या उद्भवू शकेल, असे म्हटले आहे. इतकेच नाही, तर चीनच्या हवाई दलाला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नाही, याचीही परखड जाणीव माजी वायुसेनाप्रमुखांनी करून दिली.

कित्येक दशकांपूर्वी पार पडलेल्या कोरियन युद्धात चीनच्या हवाई दलाने हल्ले चढविले होते. त्यानंतर चीनच्या हवाई दलाला युद्धाचा अनुभव आलेला नाही. त्यामुळे चीनच्या हवाई दलाची क्षमता अद्याप प्रायोगिक पातळीवरच राहिलेली आहे. त्याची कसोटी व पारख झालेली नाही, असे धनोआ यांनी स्पष्ट केले. हत्तीचे खायचे आणि दाखविण्याचे दात वेगवेगळे असतात, असा शेरा मारून चीनचे सामर्थ्य म्हणजे पोकळ बाता असल्याचा टोला माजी वायुसेनाप्रमुखांनी लगावला.

लडाखच्या एलएसीवर चीन केवळ युद्धाचा पवित्रा घेऊन दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यापेक्षा चीन काही वेगळे करण्याची शक्यता नसल्याचा निष्कर्ष माजी वायुसेनाप्रमुखांनी नोंदविला. कागदावर मांडण्यात येणार्‍या बलाबलाचा विचार केला, तर चीनचे हवाई सामर्थ्य भारतापेक्षा सरस ठरते. पण प्रत्यक्ष युद्धातील परिस्थिती खूपच वेगळी असे आणि त्यावेळी अनेक घटक प्रभाव टाकत असतात, असे सांगून माजी वायुसेनाप्रमुखांनी या आघाडीवर भारत सरस ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. त्याचवेळी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ असलेले चीनचे हवाई तळ एकमेकांपासून खूप मोठ्या अंतरावर आहेत. यातील काही तळांमध्ये तर चारशे किलोमीटर इतके अंतर आहे. मात्र भारताचे हवाई तळ एकमेकांपासून सुमारे १०० किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत, याचीही आठवण धनोआ यांनी करून दिली.

चीनचे लष्करी धोरण काही दशकांपूर्वीचे असून त्यावर सोव्हिएत रशियाच्या सामरिक धोरणाचा प्रभाव आहे. यात रॉकेटस् आणि तोफांच्या मार्‍यावर अधिक भर दिला जातो, याकडेही धनोआ यांनी लक्ष वेधले. दरम्यान, याआधी चीनने आपल्या हवाई सामर्थ्याबाबत केलेले दावे माजी वायुसेनाप्रमुख धनोआ यांनी फेटाळून लावले होते.

leave a reply