इस्रायली इंधनवाहू जहाजावर ओमानजवळ हल्ला

ओमानजवळ हल्लालंडन – संयुक्त अरब अमिरातसाठी जाणार्‍या इंधनवाहू जहाजावर ओमानजवळ हल्ला झाला. सदर जहाज इस्रायली उद्योजकाच्या मालकीचे असल्याची माहिती ब्रिटनच्या लष्करी गटाने दिली. या हल्ल्यामागे सागरी लुटारू असल्याचा दावा केला जातो. पण इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, या जहाजावर झालेल्या हल्ल्याकडे संशयाने पाहिले जाते. गेल्या महिन्याभरात इस्रायली जहाजावर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो.

गुरुवारी रात्री उशीरा ओमानची राजधानी मस्कतपासून साधारण 300 किलोमीटर अंतरावरुन प्रवास करनार्‍या ‘मर्सर स्ट्रिट’ या इंधनवाहू जहाजावर हल्ला झाला. सदर जहाज लंडनस्थित इस्रायली व्यावसायिक एअल ओफर यांच्या झोडियाक मेरिटाईम कंपनीचे असल्याची माहिती ब्रिटनच्या ‘युनायटेड किंगडम मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन्स’ने दिली.

ओमानजवळ हल्लासुरुवातीला इस्रायली कंपनीने याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. पण शुक्रवारी दुपारी सदर कंपनीने मर्सर स्ट्रिटवर हल्ला झाल्याचे मान्य केले. मात्र आपली कंपनी हे जहाज चालवते पण याची मालकी जपानकडे असल्याचे स्पष्ट केले. तरीही इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, सदर जहाजावर झालेला हल्ला चिंता वाढविणारा असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदी महासागर, ओमानचे आखात, रेड सी तसेच सिरियाच्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या इस्रायल व इराणच्या मालवाहू तसेच लष्करी जहाजांवरील हल्ले वाढले आहेत. इस्रायल व इराणमध्ये सुरू असलेल्या अघोषित युद्धाचा हा एक भाग असल्याचे दिसू लागले आहे.

इस्रायलशी संबंधित व युएईला जाणार्‍या जहाजांना लक्ष्य केले जात असल्याचेही विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाही युएईला जाणार्‍या मालवाहू जहाजावर हल्ला झाला होता. इस्रायल व युएईत प्रस्थापित झालेल्या सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवरही या दोन्ही हल्ल्यांकडे पाहिले जाते.

सायबर हल्ल्यांद्वारे जहाजे बुडविण्याची इराणचा कट – ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीची माहिती

कॅनबेरा – सायबर हल्ल्यांद्वारे इस्रायल, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांच्या मालवाहू जहाजांना जलसमाधी देण्याचा कट इराणने आखला आहे. यामागे इराणची रिव्होल्युशनरी गार्ड्स असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने उघड केली. ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी यावर चिंता व्यक्त केली. या सायबर हल्ल्यांमुळे ब्रिटनच्या पायाभूत सुविधा प्रभावित होऊ शकतात, असे वॅलेस यांनी म्हटले आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ‘शहिद कावेह’ नावाचे सायबर युनिट तयार केले आहे. इस्रायल, अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सवरील सायबर हल्ल्यांची जबाबदारी या सायबर युनिटवर असल्याचे ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीने 57 पानी गोपनीय दस्तावेजांचा हवाला देऊन सांगितले. यात संबंधित देशांची मालवाहू जहाजे, पेट्रोल पंप आणि इतर ठिकाणांचे सॅटेलाईट फोटोग्राफ्स असल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

याशिवाय अमेरिकेच्या एअरोस्पेस डिफेन्स कंपनीला लक्ष्य करण्यासाठी इराणी हॅकर्सनी बनावट सोशल मीडिया अकाऊंट्स तयार केल्याचेही उघड झाले आहे. इराणने सायबर हल्ल्याद्वारे या देशांची यंत्रणा कोलमडविण्याची मोठी तयारी केल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत.

leave a reply