चीन व रशियाच्या अंतराळातील कारवायांमुळे धोका वाढला

- ब्रिटनच्या संरक्षण अधिकार्‍यांचा इशारा

चीन व रशियालंडन – चीन व रशियाच्या अंतराळातील कारवाया हा अंतराळक्षेत्रासाठी वाढता धोका ठरत असल्याचा इशारा ब्रिटीश संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांनी दिला. गुरुवारी ब्रिटनचे ‘स्पेस कमांड’ पूर्णपणे कार्यरत झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांनी चीन व रशियाच्या धोक्याकडे लक्ष वेधले. यावेळी ब्रिटन भविष्यात ‘स्पेस वेपन्स’ तैनात करून त्यांचा वापर करु शकतो, असे संकेतही देण्यात आले. गेल्याच महिन्यात चीन व रशियाकडून महत्त्वाकांक्षी ‘मून बेस’ची घोषणा करण्यात आली होती.

चीनकडून उपग्रह भेदणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. यात उपग्रहांना थेट उडविणारी क्षेपणास्त्रे, लेझर वेपन्स, इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि थेट उपग्रहांना धडक देणारी यंत्रणा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. चीनने त्यांच्या निकामी व जुन्या उपग्रहांना लक्ष्य करून या सर्वांच्या चाचण्या घेतल्या आहेत आणि क्षमता सिद्ध केली आहे’, या शब्दात एअरचीफ मार्शल सर माईक विग्स्टन यांनी चीनच्या धोक्याबाबत बजावले. गेल्या वर्षभरात रशियाने अंतराळात शस्त्रांसारखा वापर करता येईल, अशा प्रकारचे उपग्रह तैनात केले होते, याकडेही सर विग्स्टन यांनी लक्ष वेधले. दुसरा उपग्रह उडविता येईल, अशा रितीने रशियाने या उपग्रहाच्या हालचाली केल्या होत्या, असा दावाही ब्रिटीश अधिकार्‍यांनी केला.

‘रशिया व चीनच्या अंतराळातील कारवाया अंतराळक्षेत्रातील व्यवहारांसाठी धोकादायक ठरत आहेत. या दोन्ही देशांकडून अत्यंत बेदरकारपणे मोहीमा राबविण्यात येत आहेत. वर्षातून अनेकदा त्यांच्या कारवाया दिसून आल्या आहेत’, असे एअरचीफ मार्शल सर माईक विग्स्टन म्हणाले. भविष्यातील युद्ध अंतराळात सुरू होईल का हे सांगता येणार नाही, पण त्यातील विजय किंवा पराभव अंतराळातच निश्‍चित होईल, असा इशाराही विग्स्टन यांनी दिला. जर आतापासून योजना आखून तयारी केली नाही तर जेव्हा संघर्ष भडकेल त्यावेळी, आपण तयार नसू, असेही ब्रिटीश अधिकार्‍यांनी बजावले. विग्स्टन यांच्याबरोबरच ब्रिटनच्या ‘स्टॅ्रटेजिक कमांड’चे प्रमुख जनरल सर पॅट्रिक सँडर्स यांनीही अंतराळातील धोक्यांकडे लक्ष वेधले.

अंतराळात युद्ध भडकल्यास त्याचे परिणाम लष्कराबरोबरच सामान्य नागरिकांनाही सहन करावे लागतील, याची जाणीव सँडर्स यांनी यावेळी करून दिली. यावेळी त्यांनी ब्रिटन अंतराळात ‘स्पेस वेपन्स’ तैनात करु शकतो असे संकेतही दिले. यावेळी ब्रिटनचे मिनिस्टर फॉर डिफेन्स प्रोक्युरमेंट जेरेमी क्विनदेखील उपस्थित होते. त्यांनी ‘स्पेस कमांड’ कार्यरत होणे ब्रिटनच्या संरक्षणक्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे स्पष्ट केले. ब्रिटीश हवाईदलाच्या ‘हाय वायकोम्ब’मधील तळावर ब्रिटनच्या स्पेस कमांडचे मुख्यालय उभारण्यात आले आहे. ब्रिटीश सरकारने अंतराळक्षेत्रासाठी 1.4 अब्ज पौंडाची गुंतवणूक केली असून ‘स्पेस कमांड’ त्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ब्रिटनव्यतिरिक्त फ्रान्स व जर्मनी या युरोपिय देशांनीही ‘स्पेस कमांड’ची स्थापना केली आहे.

रशिया व चीनकडून अंतराळात सुरू असणार्‍या हालचालींवर अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांनी यापूर्वीच टीका केली आहे. या दोन्ही देशांच्या हालचाली संशयास्पद असून ते अंतराळाचे लष्करीकरण करीत असल्याचा आरोप अमेरिकी अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे. तर रशिया व चीनच्या अंतराळातील आक्रमकतेला ब्रिटन प्रत्युत्तर देईल, असा उघड इशारा ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिला होता. 2019 साली नाटोनेही अंतराळक्षेत्र हे पाचवे ‘युद्धक्षेत्र’(डोमेन) असल्याचे जाहीर केले होते.

leave a reply