साऊथ पॅसिफिकमध्ये दाखल झालेल्या इराणच्या विनाशिकांवर ऑस्ट्रेलियाची नजर

इराणच्या विनाशिकांवरकॅनबेरा – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे नौदल गेल्या काही दिवसांपासून सामर्थ्य प्रदर्शन करीत आहे. आठवड्यापूर्वीच इराणच्या नौदलाने होर्मुझच्या आखातात लाईव्ह फायरिंगचा सराव केला होता. तर आत्ता इराणच्या दोन विनाशिका साऊथ पॅसिफिकमध्ये दाखल झाल्याचे उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या नौदलाने ही माहिती दिली. तसेच इराणच्या विनाशिकांवर बारीक नजर ठेवून असल्याचेही ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. याद्वारे इराण आपल्या लष्करी आणि सागरी सामर्थ्याचे प्रदर्शन करीत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियन विश्लेषक करीत आहेत.

इराणच्या नौदलातील 86 फ्लोटीलाचा भाग असलेल्या ‘आयआरआयएस मकरन’ आणि ‘आयआरआयएस देना’ या विनाशिका सप्टेंबर महिन्यापासून सागरी सफरीवर आहेत. महिन्याभरापूर्वी इंधनवाहू टँकरला सोबत देणाऱ्या इराणच्या या विनाशिका इंडोनेशियाच्या जकार्ता बंदरात काही दिवसांसाठी तैनात होत्या. त्यानंतर या विनाशिकांनी साऊथ पॅसिफिकसाठी प्रवास सुरू केला होता. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या या विनाशिका साऊथ पॅसिफिकमध्ये दाखल झाल्या आहेत.

इराणच्या विनाशिकांवरइराणच्या विनाशिकांनी ऑस्ट्रेलियाच्या सागरी हद्दीत प्रवेश केलेला नाही. पण या विनाशिकांच्या हालचालींवर आपली बारीक नजर असल्याचे ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. या विनाशिका फिलिपाईन्सचा समुद्राच्या दिशेने प्रवास करण्याची शक्यता असल्याचेही ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी या विनाशिकांनी साऊथ पॅसिफिकमधील फ्रेंच पॉलिनेशियाच्या द्विपसमुहाचा भाग असलेल्या मार्क्यूसेस आयलँड्‌‍सच्या जवळून प्रवास केला होता.

फ्रेंच पॉलिनेशिया हे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील फ्रान्सची बेटे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे फ्रान्सच्या पॅसिफिक कमांडने इराणी जहाजांशी संपर्क करून त्यांचा इरादा जाणून घेतला होता. यानंतर सावध झालेल्या ऑस्ट्रेलियाने देखील इराणी जहाजांवर पाळत ठेवली आहे. याआधी चीनच्या विनाशिकांनी ऑस्ट्रेलियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात घुसखोरी केली होती. सदर प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनच्या विनाशिकांची ही गस्त ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाने केला होता. या पार्श्वभूमीवर, इराणी विनाशिकांच्या गस्तीकडे ऑस्ट्रेलियाचे नौदल अधिक सावधपणे पाहत आहे.

leave a reply