इराणमधील निदर्शनात कासेम सुलेमानी विरोधात घोषणा

- रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या

कासेम सुलेमानीतेहरान – कासेम सुलेमानी यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने इराणची राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांमध्ये अमेरिकेचा धिक्कार करणारी तसेच सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याची मागणी करणारी निदर्शने पार पडली. या निदर्शकांचा सामना इराणच्या राजवटीविरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांशी झाला. या आंदोलकांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणाऱ्या घोषणा दिल्या. तसेच या आंदोलकांनी सुलेमानी यांचे पोस्टर्स, पुतळे यांची जाळपोळ केली. तर राजधानी तेहरानच्या रस्त्यावर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.

2020 सालच्या 2 जानेवारी रोजी अमेरिकेने इराकची राजधानी बगदादमध्ये ड्रोन हल्ला चढवून इराणच्या कुद्स ब्रिगेड्सचे प्रमुख कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली होती. सुलेमानी यांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या अमेरिका, इस्रायल तसेच संबंधित अधिकाऱ्यांचा सूड घेण्याची धमकी इराणने दिली होती.

कासेम सुलेमानीत्यानंतर दरवर्षी 2 जानेवारीला इराण तसेच इराकच्या काही भागात सुलेमानी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी अमेरिकाविरोधी निदर्शनांचे आयोजन केले जाते. यावर्षीही राजधानी तेहरान तसेच सुलेमानी यांचे जन्मस्थान केरमान या शहरांमध्ये इराणच्या राजवटीने निदर्शनांचे आयोजन केले होते. पण राजधानी तेहरानमधील काही भागात राजवटीचे समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. पण राजधानी तेहरानसह इतर शहरांमध्ये राजवटीच्या विरोधात निदर्शने करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचे व्हिडिओज्‌‍ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये सुलेमानी यांचे पोस्टर्स, प्लाकार्ड्‌‍स आणि पुतळ्यांना आग लावल्याच्या बातम्या आल्या आहेत. महाबाद शहरात निदर्शकांनी ‘खामेनी यांचा विनाश होवो’, ‘धार्मिक नेत्यांच्या राजवटीचा विनाश होवो’ अशा घोषणा दिल्या. यावेळी कुर्द निदर्शकांनी ‘कुर्द-बलोच बांधव आहेत’, या घोषणा देऊन इराणच्या राजवटीविरोधात सिस्तान-बलुचिस्तानात प्रांतात बलोचांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले.

तर राजधानी तेहरानमध्ये निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या ‘आयआरजीसी’चा वरिष्ठ कमांडर कासेम फतोल्लाही यांच्यावर चार गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या गोळीबारात रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचा आणखी एक जवान जखमी झाला आहे. या हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सने जाहीर केले.

इराणच्या राजकीय व्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण असलेले सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना इराणमध्ये मोठा आदर दिला जातो. तर अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेले कासेम सुलेमानी यांच्याकडे इराणमध्ये नायक म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे सुलेमानी यांच्याविरोधात झालेली ही उग्र निदर्शने इराणच्या राजवटीसाठी मोठा हादरा असल्याचा दावा युरोपमध्ये वास्तव्य करणारे इराणवंशिय करीत आहेत.

दरम्यान, गेल्या 109 दिवसांपासून पेटलेल्या या निदर्शनांमुळे इराणच्या राजवटीत तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍समध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी ही निदर्शने हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून लवकरच इराणमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येईल, असा दावा केला जातो. याबाबत नुकतीच एक बैठक पार पडल्याची माहिती दिली जाते. मात्र याला अधिकृत पातळीवरून दुजोरा मिळालेला नाही.

leave a reply