ऑस्ट्रेलिया चीनवर सूड उगवित आहे

- चीनच्या सरकारी मुखपत्राचा आरोप

वॉशिंग्टन – ऑस्ट्रेलियन सरकार चीनच्या राजवटीकडे विरोधातील विचारसरणी म्हणून पहात असून चीन हा धोका आहे, अशा भूमिकेतूनच निर्णय घेतले जात आहेत, असा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेला नवा निर्णयही चीनविरोधात सूड उगविण्याचा भाग असल्याचा आरोप चीनच्या ‘पीपल्स डेलि’ या दैनिकाने केला. ऑस्ट्रेलियाने हे आरोप स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकले असून, चीनने एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियन उत्पादनांवर निर्बंध टाकण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांना चीनकडून थातुरमातुर उत्तरे देण्यात आली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा मुद्दा थेट जागतिक व्यापार संघटनेत उपस्थित करण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन सरकारने चीनच्या कोणत्याही दडपणापुढे न झुकण्याचा इशाराही दिला आहे.

चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात छेडलेल्या व्यापारयुद्धामागे गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियन सरकारकडून घेण्यात येणारे निर्णय तसेच अहवाल कारणीभूत ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राजकारणासह उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण या क्षेत्रांमध्ये चीन आपला प्रभाव प्रचंड प्रमाणात वाढवित असल्याचे समोर आले होते. चीनचा हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाने एकापाठोपाठ एक कायदे तसेच आक्रमक निर्णय घेण्याचा धडाका लावला. त्याचवेळी जगभरात फैलावलेल्या कोरोना साथीच्या मुद्यावर चीनविरोधात ठाम भूमिका घेऊन चौकशीचीही मागणी केली. साऊथ चायना सी, हाँगकाँग, ५जी यासारख्या अनेक मुद्यांवर ऑस्ट्रेलियाने चीनचे दडपण उघडपणे झुगारले.

या घटनांमुळे चीन बिथरला असून सातत्याने धमक्या व इशारे देण्याचे सत्र सुरू केले आहे. चीनच्या मुखपत्राने दिलेल्या नव्या इशार्‍यामागे काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन संसदेत मंजुर झालेल्या कायद्याची पार्श्‍वभूमी आहे. या कायद्यानुसार, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना देशातील विविध प्रांतांनी तसेच संस्थांनी परदेशी राजवटींबरोबर केलेले करार रद्द करण्याचा अधिकार मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतातील सरकारने चीनबरोबर अनेक करार केले असून त्याविरोधात कायद्याचा वापर होईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे चीनची राजवट संतापली असून मुखपत्राच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला धमकावण्याचे उद्योग सुरू आहेत.

मात्र चीनच्या या कारवायांवर आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली असून ऑस्ट्रेलियाच्या सहकारी तसेच मित्रदेशांनी ठामपणे पाठिशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘फाईव्ह आईज अलायन्स’ या गुप्तचर यंत्रणांच्या आघाडीच्या गटाने चीनविरोधातील संघर्षात ऑस्ट्रेलियाला सहकार्य देण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे संकेतही दिले होते.

leave a reply