चीनला रोखण्यासाठी तैवानला ‘क्वाड’मध्ये सामील करून घ्या

- तैवानच्या वरिष्ठ नेत्याचे आवाहन

तैपेई – भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार लोकशाही देशांच्या ‘क्वाड’मध्ये तैवानला देखील सहभागी करून घ्या. चीनला रोखायचे असेल तर तैवानचा ‘क्वाड’मधील समावेश महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे आवाहन तैवानचे वरिष्ठ नेते ‘वँग टिंग-यू’ यांनी केले. वँग हे तैवानच्या सत्ताधारी ‘डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (डिपीपी) नेते आहेत. तैवान हा आपलाच भूभाग असल्याचा दावा करणार्‍या चीनकडून तैवानच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनावर प्रतिक्रिया येऊ शकते.

वँग टिंग-यू हे तैवानच्या ‘डिपीपी’चे नेते आणि तैवानी संसदेतील ‘परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा समिती’चे अध्यक्ष आहेत. ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या वृत्तवाहिनीने नुकतीच त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये वँग यांनी तैवान आणि ऑस्ट्रेलियात सहकार्याचे नवे दालन उघडण्यासाठी नवनवीन संधी असल्याचे म्हटले आहे. तैवान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही लोकशाही देश असल्याचे वँग यांनी यावेळी अधोरेखित केले.

‘तैवानला लोकशाहीवादी देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करायचे आहे. जर लोकशाहीवादी देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले तर उभय देशांच्या आर्थिक व संरक्षणविषयक क्षमतेच्या विकासासाठी त्याचा मोठा फायदा होईल’, असा दावा वँग यांनी केला. ऑस्ट्रेलिया आणि तैवान यांच्यात राजनैतिक स्तरावर कुठल्याही प्रकारचे सहकार्य नाही. ‘पण काही क्षेत्रांमध्ये काही प्रमाणातील सहकार्य दोन्ही देशांसाठी चांगल्या दिशेला प्रवास करणारे असेल’, असे वँग म्हणाले.

ऑस्ट्रेलियाची या क्षेत्रातील भूमिका वाढल्याचे सांगून वँग यांनी ‘क्वाड’कडे ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीचे लक्ष वेधले. ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील चीनच्या आक्रमकतेला आळा घालायचे असेल तर तैवानसारख्या देशाला ‘क्वाड’सारख्या संघटनेत सामील करून घेणे महत्वाचे ठरेल, असे वँग यांनी स्पष्ट केले. तैवान हा ‘क्वाड’चा चांगला सहकारी देश ठरू शकतो, असा दावाही तैवानच्या वरिष्ठ नेत्यांनी केला.

दरम्यान, ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी ‘क्वाड’ची स्थापना झाली आहे. ही संघटना कुठल्याही प्रकारे या क्षेत्रातील कुठल्याही देशाच्या सुरक्षेला धोकादायक नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पण भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या या संघटनेची स्थापनाच चीनच्या विरोधातून झाली आहे. ही संघटना ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील नाटो’ असल्याची टीका चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी केली होती. त्याचबरोबर महिन्याभरापूर्वी हिंदी महासागर क्षेत्रात ‘क्वाड’ सदस्य देशांच्या युद्धसरावावरही चीनने आक्षेप घेतला होता.

leave a reply