अमेरिकी संसदेच्या सभापती पेलोसी यांच्या आर्मेनिया भेटीवर अझरबैजान-तुर्कीची टीका

सभापती पेलोसीबाकु/येरेवान – अमेरिकी संसदेतील प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांची आर्मेनिया भेट व त्यांनी केलेली वक्तव्ये कॉकेशस क्षेत्रातील शांततेसाठी अडथळे ठरतील, असा ठपका अझरबैजानच्या विश्लेषकांनी ठेवला आहे. पेलोसी यांची भेट व अमेरिकी सहाय्याची वक्तव्ये यावर अझरबैजानसह तुर्कीकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पेलोसी यांची वक्तव्ये दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला. तर तुर्कीचे उपराष्ट्राध्यक्ष फुआत ऑक्तात यांनी, सभापतींची वक्तव्ये ही अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे का याचा खुलासा व्हावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, रविवारी आर्मेनियात रशियापुरस्कृत ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी टीि ऑर्गनायझेशन-सीएसटीओ’ गटातून बाहेर पडावे यासाठी निदर्शने झाल्याचे समोर आले आहे.

अमेरिकी संसदेच्या सभापती पेलोसी यांनी रविवारी आर्मेनियाला भेट दिली. या भेटीत त्यांनी नवा संघर्ष अझरबैजानने चढविलेल्या हल्ल्यांमुळेच भडकला असून हे हल्ले बेकायदेशीर तसेच घातक असल्याचा आरोप केला. त्याचवेळी आर्मेनियाच्या सार्वभौमत्त्वाला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असून या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते सहाय्य पुरविण्यास अमेरिका वचनबद्ध आहे, अशी ग्वाहीदेखील दिली. आर्मेनिया व अझरबैजानमध्ये गेल्या आठवड्यात भडकलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पेलोसी यांची भेट व वक्तव्ये लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत.

सभापती पेलोसीपेलोसी यांच्या वक्तव्यांवर अझरबैजान व तुर्कीकडून प्रतिक्रिया उमटल्या. अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पेलोसी यांच्यावर टीका करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. ‘पेलोसी यांनी आर्मेनिया भेटीदरम्यान केलेली वक्तव्य दिशाभूल करणारी असून खेदजनक आहेत. सभापती पेलोसी यांनी अझरबैजानवर केलेले तथ्यहीन आरोप अस्वीकारार्ह आहेत. गेल्या आठवड्यात भडकलेल्या संघर्षासाठी आर्मेनियाचे लष्करी व राजकीय नेतृत्त्व जबाबदार आहे’, असे प्रत्युत्तर अझरबैजानने दिले. अझरबैजानमधील विश्लेषकांनीही पेलोसी यांच्यावर टीकेची झोड उठविली असून त्यांच्या वक्तव्यांमुळे कॉकेशस क्षेत्रातील शांततेला धोका निर्माण झाल्याचे बजावले आहे.

सभापती पेलोसीआर्मेनिया-अझरबैजान संघर्षात अझरबैजानला समर्थन दिलेल्या तुर्कीतूनही पेलोसी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘आर्मेनिया-अझरबैजान संघर्षाबाबत सभापती पेलोसी यांनी केलेली वक्तव्ये पक्षपाती आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राजनैतिक प्रक्रियेला धक्के बसण्याची शक्यता असून ही बाब अस्वीकारार्ह ठरते’, असा ठपका तुर्कीचे उपराष्ट्राध्यक्ष फुआत ऑक्तात यांनी ठेवला. पेलोसी यांची वक्तव्ये ही अमेरिकेची अधिकृत भूमिका आहे का याबाबत अमेरिकेने खुलासा करावा, अशी मागणीही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी केली.

दरम्यान, रविवारी आर्मेनियाची राजधानी येरेवानमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये, आर्मेनियाने रशिया पुरस्कृत ‘सीएसटीओ’ या गटातून बाहेर पडावे, अशा घोषणा देण्यात आल्या. रशियाने अझरबैजानविरोधातील संघर्षात आर्मेनियाला योग्य ते सहाय्य व समर्थन दिले नसल्याचे दावे माध्यमांकडून करण्यात येत आहेत. आर्मेनियाच्या काही नेत्यांनीही याबाबत वक्तव्ये केली होती. अमेरिकेच्या सभापती पेलोसी यांनीही रशिया व आर्मेनियामधील सहकार्य पुढील काळात कसे आकार घेते यावर अमेरिकेचे लक्ष असेल, असे सूचक वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर राजधानी येरेवानमधील निदर्शने लक्ष वेधून घेणारी ठरतात.

leave a reply