चीनच्या अणुप्रकल्पावर नजर ठेवण्यासाठी अफगाणिस्तानच्या बगराम तळाचा ताबा आवश्यक होता

- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

बगरामवॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानातून सैन्यमाघार घेतल्यानंतरही बगराम हवाईतळाचा ताबा अमेरिकेकडेच ठेवण्याची माझी योजना होती. कारण बगरामपासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर चीनचा अण्वस्त्रनिर्मितीचा प्रकल्प आहे. त्यामुळे चीनच्या या प्रकल्पावर नजर ठेवण्यासाठी बगराम हवाईतळ स्वत:कडे राखणे अमेरिकेसाठी आवश्यक होते’, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच बायडेन प्रशासनाने बगरामचा ताबा सोडल्यामुळे चीन या हवाईतळाचा ताबा घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगून याला बायडेन यांचे प्रशासन जबाबदार असल्याची जळजळीत टीका माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली.

काही दिवसांपूर्वी अमेरिकन वृत्तवाहिनीशी बोलताना ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेवर जोरदार ताशेरे ओढले. ‘सर्वात आधी अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्याची आवश्यकता होती. त्यानंतर अफगाणिस्तानात तैनात अमेरिकेची सर्व शस्त्रास्त्रे बाहेर काढून येथील लष्करी तळांवर हल्ले चढवून ते पुन्हा वापरता येणार नाही, अशा अवस्थेत नेणे आवश्यक होते. सरतेशेवटी अमेरिकी लष्कराने अफगाणिस्तान सोडणे अपेक्षित होते. पण बायडेन आणि त्यांच्या दांभिक लष्करी अधिकार्‍यांनी या माघारीचा क्रम उलटा करून अराजक माजवले’, अशी घणाघाती टीका ट्रम्प यांनी केली.

बगरामत्याचबरोबर अफगाणिस्तानातून माघार घेताना मागे सोडलेली शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्य यांची फार मोठी किंमत नसल्याचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांच्या विधानांचा ट्रम्प यांनी समाचार घेतला. अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानात तालिबानला सुपूर्द केलेल्या एका विमानाची किंमत जवळपास दहा कोटी डॉलर्स असल्याची जाणीव राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करून दिली.

याआधीही अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघार आणि बगराम हवाईतळावरुन बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले होते. अफगाणिस्तानातील सर्वात मोठा हवाईतळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बगराममधून माघार घेऊन बायडेन प्रशासनाने सर्वात मोठी चूक केल्याचे ट्रम्प म्हणाले होते. तसेच तालिबानला अर्थसहाय्य पुरविणार्‍या चीनने बगरामचा ताबा घेण्याची तयारी केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केला होता.

leave a reply