बालाकोटवरील हल्ल्याने वायुसेनेचे महत्त्व अधोरेखित केले

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी

नवी दिल्ली – राजकीय इच्छाशक्ती असल्यास, युद्धही नाही आणि शांतीही नाही, अशा परिस्थितीत वायुसेना परिस्थिती चिघळू न देता प्रभावीपणे कारवाई करू शकते, हे बालाकोटमधील हवाई हल्ल्याद्वारे सिद्ध झाले आहे, असे वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी म्हटले आहे. भारताशी वैर असलेले दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. हे लक्षात घेतले तर अणुयुद्धापर्यंत परिस्थिती चिघळणार नाही, अशारितीने पण प्रभावी व अचूक मारा करण्याचा पर्याय वायुसेनेमुळे नेतृत्त्वाला मिळालेला आहे, ही महत्त्वाची बाब वायुसेनाप्रमुखांनी लक्षात आणून दिली.

Chaudhari‘एअरोस्पेस पॉवर: पिव्होट टू फ्युचर बॅटलस्पेस ऑपरेशन्स’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या सेमीनारमध्ये वायुसेनाप्रमुख बोलत होते. 2019 साली ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ला घडवून सीआरपीएफच्या 40 जवानांचा बळी घेतला होता. त्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट येथे हल्ला चढवून जैशच्या दहशतवाद्यांना संपविले होते. वायुसेनेच्या या हल्ल्याचा दाखला देऊन एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी वायुसेनेचे महत्त्व अधोरेखित केले. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे आणि आपल्यावर भारताने हल्ला चढविल्यास त्याला अणुहल्ल्याने प्रत्युत्यर दिले जाईल, असा इशारा पाकिस्तान सातत्याने देत आला आहे. पण बालाकोटमध्ये भारताने हवाई हल्ला चढविल्यानंतर, पाकिस्तानच्या या धमक्या पोकळ असल्याचे सिद्ध झाले होते.

त्याचा दाखला देऊन वायुसेनाप्रमुखांनी ‘युद्धही नाही आणि शांतीही नाही’, अशा परिस्थितीत वायुसेना अतिशय प्रभावीरित्या कामगिरी करून मोहीम फत्ते करू शकते, ही बाब लक्षात आणून दिली. यामुळे हवाई क्षेत्रातील वायुसेनेचे वर्चस्व ही अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. भविष्यकाळातील युद्धात ही बाब निर्णयक ठरेल, असा दावा एअर चीफ मार्शल चौधरी यांनी केला. म्हणूनच पुढच्या काळात वायुसेनेसाठी ‘कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर्स-सीएमओएस सेन्सर्स’ आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्याची आवश्यक आहे. यामुळे जलदगतीने निर्णय घेणे सोपे जाते. याबरोबरच मानवी आणि मानवरहित तंत्रज्ञानाचे मेळ घालणे आवश्यक ठरते. कितीही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध असले तरी, ते प्रगत तंत्रज्ञान हाताळू शकणारे कुशल मनुष्यबळाला पर्याय नाही. म्हणूनच उत्तमरित्या प्रशिक्षित, परिस्थितीचे भान आणि प्रगत तंत्रज्ञानात पारंगत असलेले कुशल व्यावसायिक आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात, असा दावा वायुसेनाप्रमुखांनी यावेळी केला.

सर्वात आधी गोष्टी नीट पाहणे आणि सर्वात आधी व सर्वात जलदगतीने तिथपर्यंत पोहोचणे याबरोबरच अचूकतेने हल्ला चढवून लक्ष्य नष्ट करणे, हे आधुनिक काळातील युद्धाचे तीन प्रमुख मंत्र ठरतात, याची जाणीव वायुसेनाप्रमुखांनी करून दिली. पाचव्या श्रेणीतील अतिप्रगत लढाऊ विमाने भविष्यातील युद्धात निर्णायक भूमिका बजावतील, असा निष्कर्ष वायुसेनाप्रमुखांनी नोंदविला आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसून वायुसेनेने केलेल्या बालाकोट येथील हवाई हल्ल्याचा एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी केलेला उल्लेख लक्षणीय ठरतो. काही दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील युगांडामधील भारतीय समुदायाला संबोधित करताना बालाकोटमधील हवाई हल्ल्याचा उल्लेख केला होता. पाकिस्तानची आयएसआय ही कुख्यात गुप्तचर संघटना पुन्हा एकदा भारतविरोधी कारवाया तीव्र करीत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमधील खलिस्तानी विघटनवाद्यांना हाताशी धरून आयएसआय भारताच्या पंजाबमधील परिस्थिती चिघळल्याचा भ्रम निर्माण करीत आहे. भारतीय माध्यमांमध्ये यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

भारतातील विघटनवादी सक्रीय असल्याचे चित्र उभे करून आयएसआय आपल्या भारतविरोधी कारवाया तीव्र करीत असताना, याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, असा सुस्पष्ट संदेश भारताकडून पाकिस्तानला दिला जात असल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री व वायुसेनाप्रमुखांच्या उद्गारांमधून मिळत आहेत.

leave a reply