अमेरिकेचा भारताबरोबरील व्यापार वाढल्यानंतर चीनचे डोळे उघडले

मुंबई – चीनला मागे टाकून अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. 2022-23 सालच्या व्यापाराचे तपशील उघड झाल्यानंतर ही बाब समोर आली आणि त्यानंतर चीनचे डोळे उघडू लागले आहेत. भारताबरोबरील द्विपक्षीय व्यापारात फार मोठी तफावत असून चीनकडून भारताला होणाऱ्या निर्यातीच्या तुलनेत, भारतातून चीनला केली जाणारी निर्यात नगण्य असल्याचे चीनच्या ‘काऊन्सिल जनरल’ काँग शिआनहुवा यांनी मान्य केले. मात्र ही आकडेवारी सारे काही स्पष्ट करणारी नाही, मेक इन इंडियाद्वारे भारत चीनमधील निर्यात वाढवू शकेल, असे सांगून शिआनहुवा यांनी आपल्या देशाचा बचाव केला.

CHINA-CG-KONGभारत व चीनमधील द्विपक्षीय व्यापारात भारताला सुमारे 101 अब्ज डॉलर्सची तूट सहन करावी लागत आहे. भारताने वारंवार मागणी करूनही चीनने फार्मास्युटिकल्स, आयटी आणि शेती क्षेत्र भारतीय उद्योगांसाठी खुले केले नाही. तसे झाले तर भारत चीनची या क्षेत्रातील बाजारपेठ काबीज करेल, अशी चिंता या देशाला वाटत आली आहे. म्हणूनच एकीकडे भारतीय बाजारपेठेचा पूर्णपणे लाभ घेणारा चीन दुसऱ्या बाजूला भारताला आपल्या या क्षेत्रात प्रवेश द्यायला तयार नाही. म्हणूनच द्विपक्षीय व्यापार चीनच्या बाजूने झुकलेला आहे.

ही व्यापारी तूट आता 101 अब्ज डॉलर्सवर गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चीनला नाईलाजाने याची दखल घ्यावी लागत आहे. त्यातच अमेरिका हा चीनला मागे टाकून भारताशी सर्वाधिक प्रमाणात व्यापार करणारा देश बनला आहे. पुढच्या काळात अमेरिकेला भारतात अधिक व्यापारी संधी मिळतील व त्याचा फटका आपल्याला बसू शकतो, याची जाणीव चीनला झाली आहे. त्यामुळे व्यापारविषयक परिषदेत बोलताना ‘काऊन्सिल जनरल’ काँग शिआनहुवा यांनी ‘मेक इन इंडिया’चा वापर करून भारत चीनमधील निर्यात वाढवू शकेल, असे गाजर दाखविले आहे.

त्याचवेळी चीनबरोबरील द्विपक्षीय व्यापारात भारताला फार मोठी तूट सहन करावी लागत असली, तरी ही आकडेवारी सारे काही स्पष्ट करणारी नसल्याचा दावा शिआनहुवा यांनी केला. भारत इतर देशांना करीत असलेल्या निर्यातीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल चीनमधूनच भारतात जातो. त्यामुळे भारताची इतर देशांना होणारी निर्यात चिनी कच्च्या मालावर अवलंबून आहे, याकडे काँग शिआनहुवा यांनी लक्ष वेधले.

त्याचवेळी भारतीय व्यापाऱ्यांशी मैत्रिपूर्ण संबंध विकसित करा, त्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला शिआनहुवा यांनी आपल्या व्यापाऱ्यांना दिला. तसेच भारत आयटी आणि चित्रपटनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर आहे, असे सांगून भारताच्या या कौशल्याचा आपण लाभ घेण्याची आवश्यकता असल्याचे शिआनहुवा यांनी चिनी उद्योगक्षेत्राला सुचविले. दरम्यान, चीनच्या भुलथापांना बळी पडून भारताने द्विपक्षीय व्यापारात होत असलेल्या अन्यायाकडे दुर्लक्ष केले. पण पुढच्या काळात चीनला याचा फार मोठा फटका बसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गलवानमधील संघर्षानंतर चीन हा भारतीयांच्या तिरस्काराचा विषय बनला आहे. तरीही आधीच्या काळात उत्पादन क्षेत्राकडे झालेल्या दुर्लक्षामुळे भारत अजूनही बऱ्याच प्रमाणात कच्च्या मालासाठी चीनवर अवलंबून आहे. पण ही परिस्थिती बदलू लागली असून भारतीय उद्योगक्षेत्र चीनवरील अवलंबित्त्व कमी करू लागल्याचे दिसते आहे. पण ही प्रक्रिया एकाएकी होणारी नसून त्यासाठी काही काळ जावा लागेल. तोपर्यंत चीन भारताबरोबरील व्यापाराचे लाभ घेईल. मात्र त्यानंतरच्या काळात चीनला भारताच्या व्यापारी औदार्याचा लाभ मिळणार नसल्याचे दावे केले जातात.

leave a reply