विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ची ‘बेसिन ट्रायल’

कोची – भारताच्या पहिल्यावहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेची ‘बेसिन ट्रायल’ अर्थात उथळ पाण्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे. २०२१ सालच्या सुरुवातीपासून ‘विक्रांत’ची सागरी चाचणी सुरू होईल, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. भारताचे नौदल ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेसह सज्ज असून ‘विक्रांत’च्या समावेशामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.

‘विक्रांत’

भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासात ‘आयएनएस विक्रांत’ आणि ‘आयएनएस विराट’ या दोन विमानवाहू युद्धनौकांनी भरीव कामगिरी बजावली आहे. या दोन्ही त्याचबरोबर सध्या भारतीय नौदलात कार्यरत असलेली ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही परदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. मात्र लवकरच भारताला स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका मिळणार आहे. सोमवारी कोचीन शिपयार्डमध्ये निर्मिती झालेल्या ‘आयएनएस विक्रांत’ची सोमवारी बेसिन ट्रायल घेण्यात आली. सागरी चाचणी घेण्यासाठी युद्धनौकेला खोल पाण्यात सोडण्याआधी या युद्धनौकेतील प्रोपल्शन प्लांट तसेच गॅस टर्बाईन्स, गिअर बॉक्स, शाफ्टींग यांची चाचणी करण्यासाठी ‘बेसिन ट्रायल’ घेतली जाते.

व्हाईस ऍडमिरल ए. के. चावला, कोचीन शिपयार्डचे अध्यक्ष मधू एस. नायर आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ही बेसिन ट्रायल पार पडली. नौदलाच्या मानकानुसार ही चाचणी यशस्वी ठरल्याचे जाहीर करण्यात आले. पुढच्या वर्षी ‘विक्रांत’ची सागरी चाचणी सुरू होईल. सदर सागरी चाचणीनंतर ‘विक्रांत’ भारतीय नौदलातील समावेशासाठी सज्ज होणार आहे. पुढच्या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२२ सालच्या सुरुवातीला ‘विक्रांत’ भारतीय नौदलात सहभागी होईल, असा दावा केला जातो.

‘विक्रांत’ विमानवाहू युद्धनौकेवर ३० लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स तैनात केली जाऊ शकतात. यामध्ये ‘मिग-२९के’ या विमानांचा तर ‘केए-३१’ हेलिकॉप्टर्सचा समावेश असेल. तर १६० अधिकारी आणि १४०० नौसैनिक विक्रांतमधून प्रवास करू शकतात. २६० मीटर लांब असलेली विक्रांत ताशी २८ सागरी मैल वेगाने प्रवास करू शकते.

leave a reply