अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न

नवी दिल्ली – ”श्रीराम” ही भारताची मर्यादा आहे. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आज अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्यदिव्य मंदिरासाठी भूमीपूजन संपन्न झाले. श्रीरामांचे हे मंदिर भारतीय संस्कृतीचे आधुनिक प्रतीक बनेल. तसेच भारताची शाश्वत आस्था आणि राष्ट्रीय भावना याचेही हे मंदिर प्रतीक ठरेल”, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाकडे डोळे लावून बसलेल्या भारतीयांसह जगभरातील कोट्यवधी जनतेचे अभिनंदन केले. त्याचवेळी सर्वांना प्रेमाने आपलेसे करणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रानी ‘भय बिनु होइ न प्रीति’ हा संदेश दिला आहे. त्यानुसार भारत अधिकधिक सामर्थ्यशाली होऊन सर्वांना त्याच्या धाकात ठेऊन चांगले वागण्यास भाग पाडेल, असे सूचक उद्गार पंतप्रधानांनी काढले.

Ayodhya-Ram-Mandirबुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यासाठी गेले कित्येक दिवस तयारी सुरु होती. संपूर्ण अयोध्या नगरी यासाठी फुले, पताक्यांनी सुशोभित करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी हजारो दीप प्रज्वलित करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच गेल्या दोनदिवस आधीपासूनच अयोध्येत विशेष आमंत्रितांचे येणे सुरु झाले होते. कोरोनाच्या साथीमुळे हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. मात्र कित्येक जण या सोहळ्याला व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित राहिले. तसेच देशातच नव्हे जगभरात हा सोहळा वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी जणांनी अनुभवला. अमेरिका, इस्रायल, युरोपात लक्षावधी जणांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहिले. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्क्वेयरमध्ये बिलबोर्डावर राम मंदिराचा हा सोहळा झळकला, वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीयांनी जल्लोष केला.

जवळपास ५०० वर्ष अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न सुरु होते. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर येथे राममंदिर उभारण्याचा खुला प्रशस्त झाला होता. त्यानंतर राममंदिर उभारणीसाठी सर्वोच न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्ट बनवून भव्य राम मंदिर उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. गेल्या महिन्यात ५ ऑगस्ट ही तारीख भूमीपूजनासाठी निश्चित करण्यात आली होती. बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल झाले. हनुमान गढीचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधानांनी अस्थायी राममंदिरात श्रीरामांचे दर्शन त्यांनी घेतले. यानंतर पंतप्रधानाच्या हस्ते भूमीपूजन संप्पन्न झाले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास उपस्थित होते. तसेच विविध पंथ आणि समुदायाचे प्रमुखही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

यानंतर पंतप्रधानांनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्य लढ्यात ज्या प्रमाणे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच स्तरातील जनतेने सहभाग घेतला. त्याच प्रमाणे आज देशभरातील जनतेच्या सहयोगाने राम मंदिर उभारणीचे पावन कार्य सुरु झाले आहे, असे सांगून पंतप्रधानांनी यावर समाधान व्यक्त केले.

रामजन्मभूमीत भव्य मंदिराची उभारणी व्हावी यासाठी कित्येकांनी संकल्प केला, संघर्ष केला, अविरत कष्ट घेतले. आजचा दिवस हा त्याचेच फलित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारताच्या आदर्शात राम आहे. भारताच्या दिव्यतेत आणि दर्शनात राम आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

‘श्रीराम हे स्थळ, काळ आणि परिस्थिती प्रमाणे विचार करतात, बोलतात आणि आपले कार्य करतात. राम हे आधुनिकता आणि परिवर्तनाचे समर्थक असून त्यांच्या याच प्रेरणेने, श्रीरामांच्या आदर्शांबरोबर भारत आज पुढे जात आहे.’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताच्या सर्व प्रदेशात, निरनिराळ्या भाषांमध्ये रामायण लिहले गेले आहे आणि सर्व भागांमध्ये रामकथांचे गुणगान केले जाते. वेगेवेगळ्या रामायणात, वेगेवेगळ्या ठिकाणी राम निरनिराळ्या रूपात भेटतात. मात्र राम सर्वत्र आहे, सर्वात आहे आणि म्हणूनच राम भारताच्या विविधतेतील एकतेचे सूत्र असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. तसेच जगभरात विविध देशात राम कथा कशा गायल्या जातात, याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला.

सर्वांवर प्रेम करणारे, सर्वांना आपले मानणारे श्रीराम ‘भय बिनु होइ न प्रीति” अशीही शिकवण देतात. त्यानुसार आजचा भारत अधिकाधीक सामर्थ्यशाली बनून सर्वांना प्रितीने वागण्यास भाग पाडत आहे, असे सूचक विधान यावेळी पंतप्रधानांनी केले. भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ पाहणाऱ्या चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांसाठी हा इशारा असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply