बायडेन प्रशासनाने जर्मन जनतेला थंडीत गारठण्यासाठी सोडून दिले

- आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांचा आरोप

वॉशिंग्टन – हिवाळा तीव्र झाल्यानंतर इंधनाची टंचाई भासत असलेला जर्मनी रशियाकडून इंधन मिळविण्यासाठी निर्बंध मागे घेईल, अशी भीती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व त्यांच्या प्रशासनाला वाटत होती. ही जोखीम पत्करायची नाही, यासाठी बायडेन प्रशासनाने ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनी उडवून दिली आणि जर्मन जनतेला थंडीत गारठण्यासाठी मोकळे सोडून दिले, असा खळबळजनक आरोप अमेरिकेतील आघाडीचे पत्रकार सेमूर हर्श यांनी केला. जर्मन दैनिक ‘बर्लिनर झायटुंग’ला दिलेल्या मुलाखतीत हर्श यांनी ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीच्या स्फोटासंदर्भात काही दावेदेखील केले आहेत.

पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार हर्श यांनी गेल्या आठवड्यात आपल्या वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध केला. ‘हाऊ अमेरिका टूक आऊट द नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ असे या लेखाचे नाव होते. यात त्यांनी अमेरिकी यंत्रणांनी नॉर्वेसह इतर नाटो देशांचे सहाय्य घेऊन ‘नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन’ उडवून दिल्याचा गौप्यस्फोट केला. बायडेन प्रशासनाने त्यांचे हे दावे फेटाळले असून हर्श यांचा लेख म्हणजे ‘फिक्शन’ कल्पनाविलासाचा भाग असल्याचे म्हटले आहे.

मात्र सेमूर हर्श आपल्या लेखातील आरोपांवर ठाम असून इतर देशांमधील माध्यमांच्या सहाय्याने त्यांनी अमेरिकेच्या छुप्या कटाचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे. नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन उडवून देण्यामागे अमेरिकेचा जर्मन सत्ताधाऱ्यांवर असणारा अविश्वास हे एक प्रमुख कारण होते, असे हर्श यांनी म्हटले आहे. त्यामुळे युरोपिय देशांवर होणाऱ्या पुढील परिणामांची पर्वा न करता बायडेन यांनी नॉर्ड स्ट्रीमच्या कटाला मान्यता दिली, असा दावा अमेरिकी पत्रकारांनी केला आहे.

सप्टेंबर २०२२च्या अखेरच्या आठवड्यात रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून अज्ञात कारणांमुळे इंधनगळती झाल्याचे समोर आले होते. या गळतीप्रकरणी नाटो व युरोपिय महासंघाने रशियावर ठपका ठेवला होता. तर रशियाने यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला होता. युरोपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले तर त्यात अमेरिकेलाही संशयित म्हणून सामील करावे, अशी मागणीही रशियाकडून करण्यात आली होती. मात्र नाटो व युरोपिय महासंघाने त्याकडे दुर्लक्ष केले हेोते.

‘नॉर्ड स्ट्रीम १’ ही रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी म्हणून ओळखण्यात येत होती. तर ‘नॉर्ड स्ट्रीम २’ इंधनवाहिनी बांधून तयार असली तरी नव्या जर्मन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यातून पुरवठा सुरू झालेला नव्हता. अशा परिस्थितीत युक्रेनचे युद्ध पेटले आणि जर्मनीसह इतर युरोपिय देशांना रशियाकडून इंधन खरेदी न करण्यासाठी अमेरिकेने दबाव टाकला. सुरूवातीच्या काळात याला नकार देणाऱ्या युरोपिय देशांना काही काळाने अमेरिकेच्या या दबावासमोर झुकणे भाग पडले होते. तरीही कडक हिवाळ्यात इंधनाची कमतरता भासल्यास, जनतेच्या दडपणामुळे जर्मनीचे सरकार रशियाकडून इंधनाची खरेदी करील, अशी चिंता अमेरिकेला वाटत असल्याचे हर्श यांच्या गौप्यस्फोटामुळे जगासमोर आलेली आहे. अमेरिका आपल्याच निकटतम सहकारी देशावर विश्वास ठेवायला तयार नसल्याचे यामुळे समोर आले आहे.

leave a reply