सौदी अरेबियाला मानवाधिकारांवरून घेरण्याची बायडेन प्रशासनाची तयारी

- अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून सौदीविरोधात ताशेरे

मानवाधिकारवॉशिंग्टन – सौदी अरेबियामध्ये मानवाधिकारांचे हनन होत असून सौदीच्या राजघराण्यातील काहीजण संशयास्पदरित्या बेपत्ता झालेले आहेत’, असा शेरा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागाने मारला आहे. एका अहवालात हे दावे करून अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सौदीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याआधी तुर्कीमध्ये ठार झालेले पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या घडविण्याचे आदेश सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच दिल्याचे दावे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केले होते. त्यामुळे मानवाधिकारांच्या मुद्यावर अमेरिका सौदीला घेरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकारांशी संबंधित अहवाल प्रसिद्ध केला. एकट्या सौदीमध्ये हजारो वेळा मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. सौदीच्या मानवाधिकारराजघराण्यातील अंतर्गत राजकारणावर थेट भाष्य न करता राजघराण्यातील सदस्यांच्या अधिकारांचा मुद्दा यामध्ये उपस्थित केला. वर्षभरापूर्वी सौदीने प्रिन्स अहमद बिन अब्दुलअझिझ, प्रिन्स नईफ बिन अहमद, प्रिन्स मोहम्मद बिन नईफ तसेच प्रिन्स नवाफ बिन नईफ या चार वरिष्ठ सदस्यांना ताब्यात घेतले होते. यावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात टीका करण्यात आली आहे.

यापैकी प्रिन्स अहमद हे सौदीचे राजे सलमान यांचे सख्खे लहान बंधू तर प्रिन्स नईफ पुतणे आहेत. तर प्रिन्स मोहम्मद बिन नईफ हे राजे सलमान यांच्याच कार्यकाळात क्राऊन प्रिन्स आणि अंतर्गत सुरक्षामंत्री होते. यापैकी प्रिन्स अहमद यांनी दोन वर्षांपूर्वी राजे सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. सौदीने येमेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईच्या विरोधात लंडनमध्ये निदर्शने आयोजित करण्यात आली होती. तेव्हा प्रिन्स अहमद यांनी या संघर्षासाठी आपले सख्खे बंधू राजे सलमान व त्यांचे पूत्र क्राऊन प्रिन्स मोहम्मद जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता.

मानवाधिकारयाच काळात जर्मनीमध्ये राहणार्‍या सौदी राजघराण्यातील सदस्य प्रिन्स खालिद बिन फरहान यांनी प्रिन्स अहमद यांची भेट घेऊन बंडासाठी चिथावणी दिली होती. प्रिन्स अहमद यांच्याबरोबर प्रिन्स मुरकीन तसेच प्रिन्स मोहम्मद बिन नईफ हे देखील राजघराण्यात बंड घडविण्याच्या कटात सहभागी झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी आपले चुलते व भावांना अटक केली होती. यापैकी सौदी राजघराण्याच्या सुरक्षा रक्षकांनी प्रिन्स मोहम्मद बिन नईफ यांना ताब्यात घेतल्यानंतर पाच महिन्यांपर्यंत त्यांना कुठे नजरकैदेत ठेवले, याचा ठावठिकाणा नव्हता, असा उल्लेख सदर अहवालात करण्यात आला आहे.

अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या या अहवालात सौदीतील मानवाधिकारांच्या उल्लंघनावर टीका करून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पण या अहवालात फक्त एकदाच क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे उघडपणे सौदीच्या क्राऊन प्रिन्सना लक्ष्य करण्याचे या अहवालात टाळण्यात आले आहे. असे असले तरी, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर दडपण वाढविण्यासाठीच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

सौदी अरेबिया हा मानवाधिकारांचे पालन करण्यासाठी प्रसिद्ध असलेला देश नाही. त्याकडे अमेरिकेने वेळोवेळी दुर्लक्ष केले होते. पण आता मात्र बायडेन प्रशासन येमेनमधील संघर्ष, खाशोगी यांची हत्या आणि सौदीच्या राजघराण्यातील बेपत्ता सदस्यांचा वापर करून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलामान यांची कोंडी करण्याच्या तयारीत आहे. याच्या आधी बायडेन प्रशासनाने येमेनमधील संघर्षात सहभागी झालेल्या सौदीला अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला होता. तसेच येमेनवर ताबा असलेल्या हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळण्याचा धाडसी निर्णयही बायडेन प्रशासनाने घेतला.

राष्ट्राध्यक्ष बायडेन सत्तेवर आल्यानंतर हौथी बंडखोरांचे सौदीवरील हल्ले अधिकच तीव्र झाले आहेत, हा योगायोग नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सौदीला लक्ष्य करण्यासाठी मानवाधिकारांचा मुद्दा नव्याने उपस्थित करून अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे.

leave a reply