बायडेन प्रशासनाने इराणवरील निर्बंध बिनशर्त मागे घ्यावे

- इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरिफ यांची मागणी

तेहरान/वॉशिंग्टन – ‘अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर लादलेले सर्वच्या सर्व निर्बंध नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बिनशर्त मागे घ्यावे. तसे करताना अमेरिकेने अणुकराराबाबत इराणकडून कुठल्याही नव्या अपेक्षा ठेवू नये’, अशी मागणी इराणचे परराष्ट्र मंत्री जावेद झरिफ यांनी केली आहे. अमेरिकेत बायडेन यांचे प्रशासन आल्यानंतर खुली झालेली संधीची खिडकी फार काळ उघडी राहणार नाही, असा संदेश इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगट ‘काऊन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’च्या मासिकासाठी लिहिलेल्या लेखात इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना येत्या काळात अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, असे म्हटले आहे. ‘अधिकाधिक निर्बंध लादून इराणवर दबाव वाढविण्यासंबंधी आधीचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वीकारलेल्या अपयशी भूमिकेवर अमेरिकेचे नवे प्रशासन अडून राहू शकते. अन्यथा ट्रम्प यांची इराणविरोधी धोरणे निकालात काढून राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणसोबत नव्याने सहकार्य करू शकतात’, असा प्रस्ताव झरिफ यांनी ठेवला.

पण, हा अणुकरार करताना अमेरिका इराणकडून आपल्या मागण्यांची पूर्तता करून घेण्याचा विचार करीत असेल तर बायडेन प्रशासन मिळालेली संधीही गमावून बसेल’, असा इशारा परराष्ट्र मंत्री झरिफ यांनी केला. यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबतचा हेतू शुद्ध असल्याचे सिद्ध करावे, असे आवाहन झरिफ यांनी केले. त्याचबरोबर ट्रम्प यांनी इराणवर लादलेले जूने व नवे निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी झरिफ यांनी केली. या मोबदल्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये घेतलेल्या निर्णयापासून इराण माघार घेईल, असा दावा झरिफ यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी बायडेन यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून घोषित केलेले अँथनी ब्लिंकन यांनी इराणबरोबर अणुकरार करण्याआधी अमेरिका आखातातील इस्रायल आणि अरब मित्रदेशांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. इराण अमेरिकेच्या मागण्या मान्य करणार असेल तर अमेरिका देखील इराणबरोबर अणुकरार करण्यास तयार असल्याचे ब्लिंकन यांनी सिनेटच्या फॉरेन रिलेशन्स कमिटीसमोर सांगितले होते. यानंतर भडकलेल्या इस्रायलने इराणवरील निर्बंध मागे?घेण्याची चूक करू नका, असा इशारा दिला होता.

बायडेन प्रशासनाने इराणवरील निर्बंध शिथिल केले तर अमेरिका इस्रायल व अरब देशांचे सहकार्य गमावून बसेल, असा खरमरीत इशारा इस्रायलने दिला होता.

leave a reply