‘ड्रग्ज रॅकेट’प्रकरणी डोंगरीत ‘एनसीबी’चे पुन्हा छापे; पठाणच्या नोंदवहित २० जणांच्या नावाचा खुलासा

- अमली पदार्थांच्या पैशांचा देशविरोधी कारवायांसाठी पुरवठा

मुंबई – शुक्रवारी मुंबईतील डोंगरी भागात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) चार ठिकाणी छापे टाकले. या छाप्यादरम्यान एकाला अटक करण्यात आली. बुधवारी सायंकाळी डोंगरीमध्ये मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनविणार्‍या छुप्या ठिकाणावर छापा मारला होता. यावेळी १२ कीलो ‘एमडी’ ड्रग्ज आणि २.१८ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली होती. याआधी दाऊदचा साथीदार आणि कुख्यात गँगस्टर करिम लालाचा नातेवाईक असलेल्या परवेझ खान उर्फ चिंकू पठाणला एनसीबीने घणसोलीतून अटक केली होती. मुंबईत ‘एमडी’ ड्रग्ज होणारा ७० टक्के पुरवठा याच टोळीकडून केला जात होता, अशी माहिती समोर येत आहे. तसेच अमली पदार्थांच्या या अवैध व्यापारातून मिळणारा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे उघड होत असल्याचे ‘एनसीबी’च्या सूत्रांनी म्हटले आहे.

‘एनसीबी’चे विभागीय अधिकारी समीर वानखडे यांना महामुंबई परिसरात होत असलेल्या ड्रग्ज तस्करी व विक्रीसंदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर चिंकू पठाण घणसोलीत ‘एनसीबी’च्या तावडीत सापडला. त्याचे दोन साथीदारही पकडले गेले. पठाण हा एकेकाळचा अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाचा नातेवाईक असून त्याचा दाऊद टोळीशी संबंध असल्याचे सांगितले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांशीही पठाणचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

पठाणच्या चौकशीत डोंगरीतील प्रसिद्ध नूर मंझिल या इमारतीतील अरिफ भुजवाला यांच्या घरात चालणार्‍या ‘एमडी’ ड्रग्जच्या छुप्या कारखान्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी सायंकाळीच ‘एनसीबी’ने अरिफ भुजवाला याच्या घरावर छापा टाकला. भुजवाला घरात सापडला नसला, तरी घरातून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. भुजवाला हा दक्षिण मुंबईत ड्रग्ज सिंडिकेट चालवत असून पठाण हा भुजवालाचाही नातेवाईक असल्याचे समोर येत आहे.

भुजवालाच्या घरात ‘एमडी’ हे सिंथेटिक ड्रग्ज बनविण्याची एक प्रयोगशाळाच स्थापन करण्यात आली होती. घरातून ५.७ कीलो मेफेड्रॉन, १ कीलो मेथमॅफेटाइन, ६.१ इफेड्रिन या सिंथेटिक अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. २.१८ कोटी रुपयांची रोकड आणि एक स्वयंचलित पिस्तूलही जप्त करण्यात आले.

नशेबाजीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या या सिंथेटिक अमली पदार्थांची भुजवालाच्या घरात बनवून पुढे मुंबईभर त्याची तस्करी केली जात होती. अमली पदार्थांच्या विक्रेत्यांची एक संघटीत टोळी यासाठी उभी करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमली पदार्थांचा हा अवैध व्यवसाय हा भुजवालाच्या इशार्‍यावर चालत होता आणि त्याने आपल्या टोळीत दाऊद टोळीशी संबंधीतांना सामील केले होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र त्याचवेळी मुंबईतील या अमली पदार्थांच्या व्यवसायामागे थेट दाऊद टोळीचा हात असल्याचाही संशय व्यक्त केला जातो.

‘एनसीबी’च्या सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार चिंकू पठाणकडे एक नोंदवही सापडली असून यामध्ये मुंबईत या अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांची २० जणांची नावे आहेत. पठाणबरोबर पकडल्या गेलेला राहूल वर्मा हा डीजे असून, त्याचा दुसरा साथीदार झाकीर शेख हा रॅपर आहे. एनसीबी पठाणच्या डायरीत उल्लेख असलेल्या इतरांचा शोध घेत आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अंमलबजावणी संचलनालयालाही (ईडी) पठाणच्या नोंेदवहित सापडलेल्या नावांची माहिती देण्यात आली आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

leave a reply