अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीच्या मुद्यावर बायडेन प्रशासनाची कोंडी

बायडेन

काबुल – अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर निर्णय घेणे, हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरते आहे. तालिबानबरोबर शांतीकरार करताना अमेरिकेने २०२१ सालच्या मे महिन्याच्या आधी अफगाणिस्तानाती आपले सारे सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले होते. याच्या मोबदल्यात तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार रोखण्याची तयारी दाखविली होती. तसेच अल कायदाबरोबरील संबंध ठेवणार नाही, अशी हमी देखील तालिबानने दिली. याचे पालन तालिबानने केलेले नाही, याची आठवण करून देऊन अमेरिकेचे विश्‍लेषक तसेच लष्करी अधिकारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानातून माघार घेऊ नये, असे आवाहन करीत आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात तालिबानच्या भीषण हल्ल्यांचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानात रक्तपात सुरू झाला असून अफगाणिस्तानचे सरकार यासाठी तालिबानला जबाबदार धरत आहे. तर अफगाणिस्तानचे सरकार आणि अमेरिका शांतीकराराचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने आपले २५०० सैनिक मागे घेण्याचा निर्णय घेतलाच, तर त्याचा अर्थ अफगाणिस्तानला तालिबानच्या हातात सोपविणे असाच होतो, असे इशारे विश्‍लेषक तसेच लष्करी अधिकारी देत आहेत. अफगाणिस्तानच्या सरकारने देखील अमेरिकेने सैन्य माघारीची घाई करू नये, असे आवाहन केले आहे.

अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीवर निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या तरी बायडेन प्रशासनाने सैन्यमाघारीवर फेरविचार सुरू असल्याची घोषणा केली आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील हिंसाचार थांबविलेला नाही. तसेच अल कायदाबरोबरील संबंध तोडलेले नाहीत. उलट तालिबानच्या संरक्षणाखाली अल कायदा अधिकच बलशाली बनली आहे, असा इशारा अमेरिकेतील काहीजणांनी दिला आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानातून संपूर्ण माघार घेण्याचा निर्णय अमेरिकेवर उलटल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बायडेन यांचे प्रशासन ही चूक करणार नाही, असा दावा केला जातो. त्याचवेळी अफगाणिस्तानातून सैन्य मागे न घेणे म्हणजे तालिबानबरोबर नवा संघर्ष पुकारणे ठरते, याकडेही विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत.

यामुळे अफगाणिस्तानबाबत निर्णय घेणे बायडेन यांच्यासाठी सोपे ठरणार नाही, असा निष्कर्ष निरिक्षकांकडून नोंदविला जात आहे. तर अमेरिकेने ठरल्याप्रमाणे सैन्य माघारी घेतले नाही, तर भीषण रक्तपात घडविण्याच्या धमक्या तालिबानकडून दिल्या जात आहेत.

leave a reply