बायडेन यांची इराणविषयक भूमिका इस्रायलच्या घाताचे कारण बनेल

- अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले

तेल अविव – ‘इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे सुरू असलेले प्रयत्न म्हणजे दुसरेतिसरे काही नसून, इस्रायलच्या विनाशाची कामना करण्यासारखे ठरते. यामुळे इस्रायलच नाही, तर जगाचाही विनाश होईल’, अशा जळजळीत शब्दात अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर हल्ला चढविला.

बायडेन यांची इराणविषयक भूमिका इस्रायलच्या घाताचे कारण बनेल - अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅलेइस्रायलच्या भेटीवर आलेल्या निक्की हॅले यांनी इस्रायली नेत्यांशी चर्चा करून त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी हॅले यांनी इस्रायलमध्ये नव्याने सत्तेवर आलेले सरकार आणि विरोधी पक्ष या सर्वांचे इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत एकमत असल्याचे स्पष्ट केले. इराणचा अणुकार्यक्रम म्हणजे इस्रायलसाठी मृत्यूघंटा ठरते, असे इस्रायलचे नेते एकमुखाने सांगत असताना, अमेरिकेचे बायडेन प्रशासन मात्र इराणबरोबरील अणुकरार नव्याने लागू करण्याच्या तयारीत आहे, यावर निक्की हॅले यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच याच्या भीषण परिणामांची जाणीव हॅले यांनी करून दिली आहे.

‘इराणबरोबरील अणुकरार पुनरूज्जीवित करण्यासाठी बायडेन यांच्याकडून सुरू असलेले प्रयत्न उबग आणणारे आहेत. कारण या अणुकरारानंतर इराण आपल्या धोरणात बदल करणार नाही. इराण इस्रायल आणि अमेरिकेच्या विनाशाच्या धमक्या देण्याचे थांबविणार नाही. म्हणूनच आर्थिक नाड्या आवळून इराणला नियंत्रित करणे आवश्यक ठरते. निर्बंधातून सवलत देऊन या इराणसाठी आर्थिक सहाय्याचा मार्ग मोकळा करणे म्हणजे इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा देणार्‍या दहशतवाद्यांना सहाय्य पुरविण्यासारखे आहे. कारण इराणला मिळणारे हेच आर्थिकसहाय्य हमास आणि हिजबुल्लाहला पुरविले जाईल’, असे सांगून हॅले यांनी इराणवरील निर्बंध मागे घेणार्‍या बायडेन प्रशासनावर ताशेरे ओढले.

बायडेन यांची इराणविषयक भूमिका इस्रायलच्या घाताचे कारण बनेल - अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅलेमाजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या राजदूत म्हणून काम केलेल्या हॅले यांनी बायडेन प्रशासनाच्या अरब देशांबाबतच्या धोरणांचाही समाचार घेतला. ‘इस्रायलबरोबर अब्राहम करार करणार्‍या युएई आणि बाहरिन यांचे बायडेन यांनी आभार मानणे गरजेचे होते. पण त्यांनी अद्याप तसे केलेले नाही. याउलट इराणशी वाटाघाटी सुरू करून बायडेन यांनी अरब देशांना धक्का दिला’, असा संताप हॅले यांनी व्यक्त केला. याशिवाय हमास आणि हिजबुल्लाहकडून इस्रायलला असलेल्या धोक्याबाबत हॅले यांनी सावध केले. हमासचे हल्ले म्हणजे लहान मुलाचा खेळ होता. पण हिजबुल्लाह याहून भीषण हल्ले चढवू शकेल, असा इशारा हॅले यांनी दिला.

बायडेन यांना सत्तेवर येऊन येत्या काही दिवसात पाच महिने पूर्ण होतील. या काळात बायडेन यांनी अमेरिकेचे आर्थिक, राजकीय व सामरिक स्तरावर मोठे नुकसान केल्याचा आरोप हॅले यांनी दुसर्‍या एका मुलाखतीत केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन आखातातील अस्थैर्य आणि दहशतवादी कारवायांसाठी इराणला जबाबदार धरायला तयार नसल्याचा ठपका हॅले यांनी ठेवला.

यामुळे अमेरिका आपल्या मित्रदेशांचा विश्‍वास गमावून बसली आहे. बायडेन प्रशासन ‘ओबामा २.०’ अर्थात माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचेच परराष्ट्र धोरण पुढे रेटत असल्याचा ठपका हॅले यांनी ठेवला. काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील बायडेन यांच्यावर तोफ डागली होती. बायडेन यांच्या कमकुवत धोरणांमुळे हमासने इस्रायलवर हल्ले चढविण्याची हिंमत दाखविली, असे ट्रम्प म्हणाले होते. इस्रायलवर हल्ला चढविणार्‍या हमासला इराणचे सहाय्य मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही बायडेन प्रशासन इराणबरोबरच्या अणुकरारावर ठाम आहेत. यामुळे इस्रायल आणि सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांमध्ये नाराजी वाढत चालली आहे.

leave a reply