अमेरिकेचा राखीव इंधनसाठा विक्रीला काढण्याचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा निर्णय प्रतिनिधीगृहाने रोखला

biden oilवॉशिंग्टन – अमेरिकेचा आपत्कालिन राखीव इंधनसाठ्याची चीनला विक्री करण्याचा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सादर झालेले विधेयक संमत झाले. प्रतिनिधीगृहातील रिपब्लिकन पक्षाबरोबरच डेमोक्रॅट्स पक्षातील काही सदस्यांनी देखील या विधेयकाला पाठिंबा दिला. अमेरिकन संसदेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाचे सभापती निवडून आल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना बसलेला हा पहिला धक्का ठरतो.

अमेरिकेने आपल्या व्यूहरचनेचा भाग म्हणून प्रचंड प्रमाणात इंधनाचा साठा करून ठेवलेला आहे. आपत्कालिन परिस्थितीखेरीज त्याचा वापर न करण्याचे संकेत अमेरिकेत रूढ झालेले आहेत. 2008 साली अमेरिका आर्थिक संकटात असताना आणि इंधनाचे दर कडाडले होते, त्या काळात देखील अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हा धोरणात्मक इंधनसाठा विक्रीस काढण्यास नकार दिला होता. पण बायडेन प्रशासनाने हे संकेत बाजूला सारून अमेरिकेचा हा धोरणात्मक इंधनसाठा विक्रीसाठी काढला. मुख्य म्हणजे अमेरिकेचा प्रतिस्पर्धी असलेल्या चीनला बायडेन प्रशासनाने या इंधनाची विक्री केली.

वर्षभरापूर्वी अमेरिकेकडे जवळपास 60 कोटी बॅरेल्स इतका ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ अर्थात राखीव इंधनसाठा होता. पण जुलै महिन्यात बायडेन प्रशासनाने यापैकी काही इंधनसाठा विक्रीला काढण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतला होता. यामध्ये अमेरिकेतील ‘फिलिप्स 66’ ही कंपनी आघाडीवर असल्याची बातमी समोर आली होती. सुमारे नऊ लाख 50 हजार बॅरेल्स इंधनाची चीनच्या ‘युनिपेक’ कंपनीला विक्री करण्यात आली. युनिपेक ही चीनच्या सरकारी ‘सिनोपेक’ कंपनीचा अंग आहे.

us house biden china oilचीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी संलग्न असलेल्या या इंधन कंपन्यांमध्ये हंटर बायडेन यांची गुंतवणूक असल्याचा दावा केला जातो. हंटर बायडेन हा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा मुलगा आहे. त्यामुळे चीनला राखीव इंधनसाठा पुरविण्याच्या बायडेन यांच्या निर्णयावर त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी टीका केली होती. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात बहुसंख्येने निवडून आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाने हा मुद्दा उचलून धरला. तर डेमोक्रॅट्स पक्षाच्या सदस्या ख्रिसी हॉलाहन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या सहकाऱ्यांसोबत बायडेन यांच्याविरोधात विधेयक सादर केले.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात सदर विधेयक 331 विरोधात 97 अशा मोठ्या फरकाने संमत झाले. सदर विधेयकाच्या बाजूने मत देणाऱ्यांमध्ये रिपब्लिकनच्या सर्व तर डेमोक्रॅट पक्षाच्या 113 सदस्यांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांच्या डेमोक्रॅट पक्षासाठी हा मोठा हादरा ठरतो.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापतीपदावर रिपब्लिकन पक्षाच्या केविन मॅकार्थी यांची नियुक्ती झाली. राष्ट्रीय कर्ज आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा उदय, ही दोन प्रमुख आव्हाने अमेरिकेसमोर असल्याचा दावा मॅकार्थी यांनी सभापतीपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर केला होता. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेली चीनविरोधी धोरणे आपण पुढे चालविणार असल्याचे स्पष्ट संकेत मॅकार्थी यांनी दिले होते.

leave a reply