2023मध्ये कच्च्या तेलाचे दर पुन्हा 100 डॉलर्सवर जातील

गोल्डमन सॅक्सचा दावा

Crude oil pricesवॉशिंग्टन – वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर पुन्हा प्रति बॅरल 100 डॉलर्सवर जातील, असा दावा अमेरिकेतील आघाडीची वित्तसंस्था गोल्डमन सॅक्सने केला आहे. चीनने कोरोनासंदर्भात शिथिल केलेले धोरण व जगभरातील वाढती मागणी यामुळे दर उसळी घेतील, असे गोल्डमन सॅक्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये पाच टक्क्यांहून अधिक भर पडली असून ते प्रति बॅरल 84 डॉलर्सवर पोहोचले आहेत.

गेल्या वर्षी सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 120 डॉलर्सच्या वर उसळले होते. त्यावेळी युद्ध लांबल्यास दर 150 ते 200 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत भडकतील, असे भाकितही वर्तविण्यात आले होते. रशियावर टाकलेल्या निर्बंधांनंतर दर 300 डॉलर्सपर्यंत जाण्याचा इशारा रशियन नेते व अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. मात्र जी7 गट व युरोपिय देशांनी लादलेल्या ‘प्राईस कॅप’नंतर कच्च्या तेलाचे दर घसरण्यास सुरुवात झाली. चीनमधील कोरोनाचा उद्रेक व अर्थव्यवस्थेतील उलथापालथी हे घटकही घसरणीस कारणीभूत ठरले होते.

मात्र 2023 मध्ये चीनने कोरोनासंदर्भातील निर्बंध उठविले असून अर्थव्यवस्था व सामाजिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्याचवेळी जगाच्या इतर भागांमधील मागणीही वाढत आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले नसून साठविण्याची क्षमताही कमी असल्याचे सौदी अरेबिया व इतर देशांनी यापूर्वीच बजावले होते. त्यामुळे वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर वाढण्याची शक्यता असून गोल्डमन सॅक्सचा दावा त्याला दुजोरा देणारा ठरतो.

leave a reply