गावांना कोरोनाच्या संक्रमणापासून रोखण्याचे मोठे आव्हान

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – देशासमोरील कोरोनाच्या साथीचे आव्हान हे गेल्यावर्षीपेक्षा खूप मोठे आहे. या साथीचे संक्रमण गांवापर्यंत पोहोचू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची आवश्यकता आहे. यासाठी गावांमधून सरकारांनी जारी केलेल्या निर्देेशांचे पुर्ण पालन व्हावे, हे सुनिश्‍चित करावे लागेल. यासाठी सर्वांनी कोरोनापासून बचावासाठी घातलेले नियम पाळावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

देशात चोवीस तासात २ हजार ६२४ जणांचा कोरोनाने बळी गेला, तसेच तीन लाख ४६ हजार नवे रुग्ण आढळले. यामुळे देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने १ कोटी ६६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच देशातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या २५ लाखांच्या पुढे पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या पहिल्या कोरोना लाटेपेक्षा नवी लाट भीषण असून रुग्णांमध्ये संक्रमणाचा वेग प्रचंड आहे. मात्र सध्यातरी बहुतांश प्रमाणात कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या, मध्यम आकाराच्या शहरांमधून मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. शहरांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध असतानाही त्यावर प्रचंड ताण आल्याचे व त्या अपुर्‍या पडत असल्याचे चित्र देशात सध्या सर्वत्र पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमण गावांमधून वाढल्यास मोठे खडतर आव्हान उभे राहिल.

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय पंचायन दिनानिमित्ताने बोलताना सध्याच्या संकटाची जाणीव करून दिली. गेल्यावर्षीच्या संकटापेक्षा यावर्षीचे कोरोना साथीचे संकट अतिशय मोठे आहे. गेल्यावर्षी गावांमधून ही साथ पसरू नये म्हणून केलेल्या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेने दाद दिली. ग्रामपंचायतींनी मोठी भूमीका निभावली. तसेच कोरोना संदर्भात गावांमधून जागृतीही निर्माण केली होती. आताही त्याहून मोठे आव्हान खडे ठाकले असताना कोरोना गावांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याकरीता ग्राम पंचायतींना आपली भूमिका पार पाडवी लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

यावर्षीही कोरोना संक्रमण गावांपर्यंत पोहोचण्यापासून मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. कोरोनाची साथ पसरू नये यासाठी वेळोवेळी देण्यात येत असलेल्या निर्देशांचे पालन गावात होत आहे की नाही हे सुनिश्‍चित करावे लागेल. यावर्षी आपल्याकडे लसीचे कवच आहे. मात्र त्याबरोबर नियमांचे पालनही आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात ६७६ जणांचा बळी गेला आणि ६७ हजार नवे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत सहा हजार रुग्ण आढळले आणि ७१ जणांचा बळी गेला. उत्तर प्रदेशात चोवीस तासात २२३ जणांचा या साथीने मृत्यू झाला. तसेच ३८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात २०८ जण दगावले असून २९ हजार ४३८ नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळात २६ हजार नवे रुग्ण आढळले, बिहारमध्ये एका दिवसात १२ हजार रुग्णांची नोंद झाली. मध्य प्रदेशात १०४ जणांचा कोरोनाने बळी गेला आणि सुमारे १३ हजार नव्या रुग्णांची नांेंद झाली. गुजरातमध्ये १३ हजार नवे रुग्ण सापडले असून १४२ जण दगावले. छत्तीसगडमध्ये ८० जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे १५ हजार नवे रुग्ण आढळले आहेत.

leave a reply