भारतीय अंतराळ क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा प्रतिसाद

- ‘इन-स्पेस’कडे चार परकीय कंपन्यांसह २६ कंपन्यांचे प्रस्ताव

बंगळुरू – भारत सरकारने अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या निर्णयानंतर या क्षेत्रात गुंतवणुकीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्राऊंड स्टेशन बनविण्यापासून प्रक्षेपक यान बनविण्यापर्यंतचे प्रस्ताव ‘इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अ‍ॅण्ड अ‍ॅथॉरायझेशन सेंटर’ (इन-स्पेस) अंतराळ नियंत्रक संस्थेकडे आले आहेत. यामध्ये २२ देशी कंपन्या आणि चार परकीय कंपन्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने देशाच्या नव्या अंतराळ धोरणाची घोषणा केली होती. देशात पहिल्यांदाच अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्याचा निर्णय झाला होता. तसेच परकीय कंपन्यांमध्येही भारताच्या अंतराळ क्षेत्रात गुंतवणुकीची दारे खुली करण्यात आली होती. परकीय कंपन्या भारतीय कंपनीबरोबर भागिदारीशिवायही या क्षेत्रात गुंतवणूक करू शकत असल्याने मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जात होती. अपेक्षेनुसार मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

एकूण २६ कंपन्यांचे प्रस्ताव आतापर्यंत ‘इन-स्पेस’ला मिळाले आहेत. यामध्ये २२ देशी कंपन्यांचा समावेश आहे. तर चार परकीय कंपन्यांनी भारताच्या अंतराळ क्षेत्रात गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. यामध्ये ‘अ‍ॅमेझॉन’ आणि ‘भारती ग्रुप’ची गुंतवणूक असलेली ‘वनवेब’ या ब्रिटीश कंपनीचा समावेश आहे तसेच संयुक्त अरब अमिरातच्या ‘आर्चेरोन ग्रुप’ व नॉर्वेच्या ‘काँग्सबर्ग सॅटेलाईट सर्व्हिसेस’नेही (केएसएटी) प्रस्ताव पाठविला आहे.

‘वन वेब’ने छोट्या उपग्रहांचे जाळे बनवून त्यावर आधारीत सेवांसाठी उत्सुकता दाखविली आहे. तर ‘आर्चेरोन ग्रुप’ने छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणात आणि ‘केएसएटी’ने ग्राऊंड स्टेशन उभारण्यात स्वारस्य दर्शवले आहे. भारतीय कंपन्यांमध्ये टाटाच्या ‘नेल्को’ने अर्थ ऑर्बिट नेटवर्क सेवेसाठी सहकार्य मागितले आहे. तसेच ‘एल अ‍ॅण्ड टी’ कंपनीन ‘स्मॉल सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल’ (एसएसएलव्ही) बनविण्यासाठी प्रस्ताव ‘इन-स्पेस’कडे सादर केला आहे.

याशिवाय आणखी काही कंपन्या आणि स्टार्टअप पुढे आल्या आहेत. बंगळुरूच्या अल्फा डिझाईननेही छोटे उपग्रह बनविण्यात स्वारस्य दाखविले आहे. मंगळुरू येथील श्रीनिवास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी युनिसॅट, आयआयटी-मुंबई, आयआयटी मद्रासचेही प्रस्ताव आले आहेत. स्पेसकिड्स इंडियानेही प्रस्ताव दिला आहे. भारतीय आणि परकीय कंपन्या भारतातील अंतराळ क्षेत्रात ज्या पद्धतीने स्वारस्य दाखवत आहेत, ते उत्साहवर्धक आहे, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुले केल्याचा मोठा लाभ भारताला मिळेल. या क्षेत्रात पुढील काळात मोठी प्रगती होईल. आंतरराष्ट्रीय अंतराळ अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योग येत्या काळात महत्त्वाची भूमिका निभावतील, असा विश्‍वास के. सिवन यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केला होता.

leave a reply